How To Make Rice Papad: मार्च महिना सुरु झाला की हळुहळू उन्हाळाची सुरुवात होऊ लागते, उकाडा वाढू लागतो, थंडीचे कपडे कपाटाकडे वळू लागतात. पण विशेषतः महाराष्ट्रात उन्हाळ्याची खरी सुरुवात ही तेव्हाच होते जेव्हा दारासमोर, गच्चीवर, अंगणात वाळवणं पडायला लागतात. पापड, कुरडई, शेवया ही उन्हाळ्याची खास आठवण असते. वर्षभर जेवणाबरोबर कुरुम कुरुम वाजणारे पदार्थ खाण्यासाठी उन्हाळयात एक दिवस बाजूला काढून ही सगळी कामं केली जातात. खरंतर अलीकडे हे कष्ट घेण्याचं प्रमाण खूपच कमी झालंय, कारण बाजारात सहज पापड, नळ्या उपलब्ध होऊन जातात. पण आज आम्ही आपल्याला एक अशी रेसिपी सांगणार आहोत ज्याने तुम्ही कष्ट तर कमी करूच शकता पण तरीही घरी बनवल्याचं समाधानही मिळवू शकता. एक कप तांदळाच्या पिठाचे चौपट फुलणारे पापड आज कूकरच्या भांड्यात कसे बनवायचे हे आपण पाहणार आहोत, चला तर मग..
सर्वात आधी यासाठी काय काय आवश्यक असेल ते पाहूया. तुम्ही तुमच्या अंदाजाने सुद्धा साहित्य घेऊ शकता. पण @cookingcreator.marathi यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितलेल्या प्रमाणानुसार खालील रेसिपी बघून घ्या.
- तांदळाचे पीठ एक कप /200 ग्रॅम
- पापड खार एक टीस्पून/ 5 ग्रॅम
- मीठ एक टीस्पून/ 5 ग्रॅम
- तीळ एक टीस्पून
- पाणी दोन कप
- जिरे एक टीस्पून
तांदळाचे पापड रेसिपी
- आधी एका भांड्यात दोन कप पाणी उकळून घ्या.
- कूकरच्या भांड्यात (भाताचा डब्बा) तांदळाचे पीठ काढून घ्या. २०० ग्रॅम तांदळाच्या पिठात एक टीस्पून पापड खार पुरतो. यात तितक्याच प्रमाणात मीठ घाला.
- तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाल मिरचीची पूड किंवा चिली फ्लेक्स, हिरव्या मिरचीचे काप घालू शकता अन्यथा रेसिपीनुसार एक टीस्पून तीळ आणि एक टीस्पून जिरे घालून मिसळून घ्या.
- उकळून घेतलेलं गरम पाणी घालून याची घट्टसर पेस्ट होईल असे मिसळून घ्या.
- कूकरमध्ये तळाला थोडे पाणी ठेवून त्यावर हा डब्बा ठेवा.
- एक शिट्टी काढून घ्या.
- कुकर किंचित थंड झाल्यावर, एका जाड प्लॅस्टिकच्या पिशवीवर तेलाचा एक हात फिरवून डब्यातील हे पीठ काढून घ्या. यावर दुसरी प्लास्टिकची पिशवी ठेवून मग लाटण्याने या गोळ्याला थोडं लाटून घ्या, जेणेकरून गुठळ्या असल्यास निघून जातील.
- या गोळ्याचे मग लहान लहान गोळे करून, लाटून, सुकवा.
हे ही वाचा<< बटाट्याला कोंब येऊ नये, बटाटा हिरवा पडू नये म्हणून घरी आणताच करा हा सोपा उपाय; पैसे व आरोग्य दोन्ही वाचवा
तुम्हाला लहान लहान गोळ्यांचे पापड लाटत बसायचे नसल्यास सगळ्यात सोपी टीप म्हणजे आपण प्लास्टिकच्या पिशवीला मध्ये घडी घालून घ्या. आत गोळा ठेवून त्यावर घडीचा एक भाग ठेवा. लहान ताटाने दाब देऊन हा गोळा पापडाच्या आकारात पसरवा. पापड तयार.
हे तयार पापड सुकवून तुम्ही कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कळवा.