Nagpuri Special Orange Barfi Marathi Recipe Video: नागपूरची शान मानली जाणारी संत्र्याची बर्फी या थंडीच्या महिन्यांमध्ये एकदा तरी चाखायला मिळावी अशी अनेकांची इच्छा असते. पण साहजिकच त्यासाठी प्रत्येकाला नागपूर गाठणे शक्य होईलच असे नाही. अर्थात अलीकडे अनेक ठिकाणी अशी बर्फी मिळते किंवा ती ऑनलाईन सुद्धा मागवता येते पण त्याला हवी तशी अस्सल चव असेलच अशी खात्री नाही. त्यामुळे आज आपण इतरांवर अवलंबून न राहता आपल्याला हवी तशी संत्र्याची बर्फी घरी कशी बनवता येईल हे पाहणार आहोत. यासाठी साधारण ७५० ग्रॅम म्हणजे ४-५ मोठी संत्री पुरेशी ठरतील. चला तर मग पाहूया, नागपुरी संत्रा बर्फीची सोपी मराठी रेसिपी..
संत्र्याची बर्फी ही अधिक आरोग्यदायी पर्याय का ठरते?
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ज्ञ डॉ. प्रियंका रोहतगी यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, अन्य मिठाईच्या पदार्थांपेक्षा संत्र्याची बर्फी काही प्रमाणात अधिक आरोग्यदायी मिष्टान्न ठरू शकते. याचे एक कारण म्हणजे अन्य बर्फी किंवा पिढ्यांमध्ये अधिक प्रमाणात रिफाईंड साखर, कंडेन्स्ड दूध वापरलेले असते हे दोन्ही घटक उच्च कॅलरी व ग्लायसेमिक इंडेक्स युक्त असतात ज्याचा शरीराला अपाय होऊ शकतो.
तुलनेने संत्र्याच्या बर्फीमध्ये नैसर्गिक शर्करा व ताजे दूध वापरले जाते, तसेच संत्र्यातील फायबर सुद्धा शरीराला फायदेशीर ठरू शकते. व्हिटॅमिन सी चा मुबलक साठा असलेली संत्री शरीराला अँटिऑक्सिडंट्स सह रोगप्रतिकारक शक्ती प्रदान करतात. तसेच यातील कोलेजन त्वचेचे विकार दूर करण्यास फायद्याचे ठरते. यामध्ये आपण अन्य सुकामेवा जोडल्यास याचे पोषणमूल्य आणखीनच वाढू शकते.
साहित्य
७५० ग्रॅम संत्र्याचा पल्प
५० ग्रॅम साखर
१०० ग्रॅम खोवलेला नारळ
केशरी फूड कलर
२५० ग्रॅम खवा
चांदीचा वर्ख (पर्यायी)
कृती
- संत्री नीट सोलून त्यातील बिया व दोरे काढून संत्र्याचा पल्प एका पॅनमध्ये घ्या.
- पॅनमध्ये संत्र्याचा पल्प शिजताना त्यात साखर आणि केशरी फूड कलर घालून ढवळून घ्या.
- जर तुम्हाला नैसर्गिक संत्र्याचा रंगच हवा असेल तर फूड कलर घालणे टाळू शकता.
- उकळत्या मिश्रणात खोवलेले खोबरे आणि संत्र्याची साल बारीक किसून टाका. यामुळे चव व पोत सुधारण्यास मदत होते.
- मग या मिश्रणात दूध व खवा घालून शिजवा.
- एक ट्रे तयार करा आणि त्यात शिजवलेले मिश्रण एक समान जाडसर थरात पसरवा.
- सजावटीसाठी चांदीचा वर्ख वरून सजवा, हलक्या हाताने हे सगळे काम करावे.
- ऑरेंज बर्फी किमान ३-४ तास सेट होऊ द्या. उत्तम प्रकारे सेट केल्यावर, हव्या त्या आकारात कापून खायला घ्या.
हे ही वाचा<< 90-30- 50 चा फंडा वजन कमी करताना जपेल जिभेचे चोचले; तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे ‘असं’ असावं डाएटचं ताट
दरम्यान, कितीही आरोग्यदायी पर्याय असला तरी संत्र्याची बर्फी सुद्धा अन्य गोड पदार्थांप्रमाणे कमी प्रमाणातच सेवन करायला हवे.