Misal Masala Recipe: पावसाळ्याच्या दिवसात जिभेचे चोचले वाढतात असं म्हणतात. आणि हरकतही काय आहे? एकीकडे नॉनव्हेज प्रेमींना यावर्षी दोन महिने श्रावण आल्याने अगोदरच मनाला मुरड घालायला लागली आहे. त्यात मग निदान शाकाहारी पदार्थानी तर जिभेला व पोटाला आनंदी ठेवायला हवं ना. पावसाने गारवा पसरल्यावर काहीतरी छान गरम आणि तिखट चमचमीत खायची इच्छा वाढते. आणि आता पावसाला महिना झाल्यावर भज्या तरी किती कराव्या आणि खाव्या असंही वाटू लागतं. अशावेळी झणझणीत मिसळ हा एक चविष्ट पर्याय ठरू शकतो. तुम्हाला मिसळ बनवताना घरच्या नियमित भाजीपेक्षा वेगळी कशी चव आणायची हा प्रश्न पडला असेल तर आज आपण घरच्याघरी साठवणीचा मिसळ मसाला कसा तयार करायचा याची सविस्तर कृती पाहणार आहोत. चला तर मग…
मिसळ मसाला साहित्य
1 टीस्पून तेल
१ मोठा कांदा चिरलेला
सुक्या खोबऱ्याचे काप किंवा किस
10-12 कापलेल्या लसूण पाकळ्या
आले
(मसाला जास्त दिवस टिकण्यासाठी तुम्ही कांदे आणि लसूण तळून घेऊ शकता)
४-५ काश्मिरी सुक्या लाल मिरच्या
४-५ बेडगी सुक्या लाल मिरच्या
१०-१२ काळी मिरी
७-८ लवंगा
१ मोठी वेलची
८-१० हिरव्या वेलची
२ ताराफुल
1 इंच दालचिनी
1 टीस्पून जिरे
1 टीस्पून बडीशेप
1 टीस्पून पांढरे तीळ
¼ कप धणे
½ टीस्पून खसखस
1 टीस्पून वाळलेले आले पावडर
1 टीस्पून सैंधव मीठ
हिंग
कृती: ही सगळी सामग्री वर दिलेल्या विभाजनानुसार काळ्या तव्यावर (बिड्याच्या तव्यावर) भाजून घ्या व मग मिक्सरला वाटून एकत्र करून घ्या. पुढच्यावेळी तुम्हाला जेव्हा मिसळ बनवायची असेल तेव्हा फक्त फोडणीच्या वेळी एखाद्या चिरलेल्या कांद्याची फोडणी देऊन त्यावर हा मसाला व मग आवडीनुसार कडधान्य घालून मिसळ बनवू शकता.
हे ही वाचा<< १ वाटी बेसनपासून बनवा कुरकुरीत ‘झुणका वडी’; तेलकट भजीलाही विसरून जाल; पाहा Video
टीप: हा मसाला नीट कोरड्या डब्यात स्टोअर करून ठेवला तर भरपूर दिवस टिकून राहू शकतो.