Car Mirror And Glass Cleaning Video: पावसाळ्यामध्ये अपघातांचे प्रमाण सर्वाधिक असते. रस्त्यावर झालेला चिखल, पाण्यामुळे घसरट झालेला रस्ता, कधी जरा जास्त पाऊस पडला तर पाणी साचण्याच्या घटना, सिग्नल यंत्रणेत वरच्यावर वर होणारे बिघाड या साऱ्यामुळे पावसाळ्यात गाडी बाहेर काढायची म्हणजे डोक्याला ताप होतो. तर दुसरीकडे पावसाळी सहलींमध्ये बाईक किंवा गाडी घेऊन फिरायला जाणे हे अनेकांसाठी थ्रिलिंग ठरतं. आता तुम्ही यातल्या दोन्हीपैकी कोणत्याही गटात असलात, किंवा दोन्हीमध्ये नसून फक्त गरजेपुरती गाडी चालवत असाल तरीही आजचा लेख तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पावसाळ्यात अनेकदा गाडीच्या काचांवर, आरशांवर पाणी साचते, वायपरने तुम्ही गाडीची काच स्वच्छ केलीत तरीही हे प्रमाण काही कमी होत नाही. याच समस्येवर आज एक बटाटा वापरून कसा उपाय करता येईल हे आपण पाहणार आहोत.
गाडीच्या आरशांवर पाणी साचल्याने अनेकदा मागून येणाऱ्या गाड्या दिसत नाहीत, शिवाय पावसात बाहेरील वातावरण धुक्याचे असेल तर अंधुक दिसू लागते. अशावेळी समोरच्या काचेवर फिरणारा वायपरही अडथळा ठरू शकतो. तुम्हाला हा त्रास थांबवायचा असेल तर फक्त किचनमधील एक छोटा बटाटा उचलून आणायचा आहे आणि मग खालील स्टेप फॉलो करून तुम्हालाच तुमचं उत्तर मिळू शकेल.
१) बटाटा अर्धा कापा.
२) बटाट्याचा कापा गाडीच्या काचेवर व आरशावर गोल फिरवून घ्या
३) उत्तम परिणामांसाठी निदान ३० सेकंद बटाटा काचेवर फिरवा
४) यानंतर दोन मिनिट बटाट्याचा रस काचेवर सुकू द्या.
५) यानंतर पाणी काचेवर टिकतच नाही हे तुमच्याही लक्षात येईल.
टीप: शक्य झाल्यास हा प्रयोग गाडी घेऊन बाहेर पडण्याआधी करा जेणेकरून बटाट्याचा रस काचेवर नीट टिकून राहू शकेल.
हे ही वाचा<< २ रुपयांच्या मेणबत्तीने घरातील नळांची ‘ही’ समस्या करा दूर! पावसाळ्यात होईल खूपच मदत, पाहा Video
इंस्टाग्रामवर व्हायरल झालेली ही हॅक अनेकांनी करून पाहिली आहे आणि आपल्याला चांगला परिणाम दिसल्याचेही या मंडळींनी नमूद केले आहे. तुम्हीही प्रयोग म्हणून हे नक्कीच करून पाहू शकता. तुम्हाला याने फायदा होतोय का हे आम्हाला कळवायला विसरू नका.