चीनच्या Vivo कंपनीने आपल्या X-सीरिज अंतर्गत दोन नवे स्मार्टफोन Vivo X30 आणि Vivo X30 Pro लाँच केले आहेत. सध्या हे दोन्ही फोन केवळ चीनमध्येच लाँच करण्यात आले आहेत, पण लवकरच भारतातही लाँच करण्याची शक्यता आहे. Vivo X30 आणि Vivo X30 Pro हे दोन्ही 5G फोन असून यात Exynos 980 प्रोसेसर आहे. दोन्ही फोनच्या कॅमेऱ्यामध्ये थोडाफार फरक आहे, इतर सर्व फीचर्स सारखेच आहेत. हे दोन्ही स्मार्टफोन 8GB रॅम + 128GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB रॅम + 256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आले आहेत.
चीनमध्ये Vivo X30 Pro च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 3,998 युआन (जवळपास 40,500 रुपये) आहे. ही किंमत 8GB रॅम + 128GB स्टोरेज व्हेरिअंटची आहे. तर याच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 4,300 युआन (जवळपास 43,600 रुपये) आहे. तर, Vivo X30 च्या बेसिक व्हेरिअंटची किंमत 3,298 युआन (जवळपास 33,400 रुपये) आहे. तर, टॉप व्हेरिअंटची (8GB रॅम + 256GB स्टोरेज ) किंमत 3,598 युआन (जवळपास 36,400 रुपये) आहे.
फीचर्स –
दोन्ही स्मार्टफोनमध्ये 6.44 इंच फुल HD+ सुपर अॅमोलेड डिस्प्ले असून व्हिवोने याला XDR डिस्प्ले असं नाव दिलंय. डिस्प्लेमध्ये 32 मेगापिक्सल क्षमतेचा पंचहोल कॅमेरा आहे. हे स्मार्टफोन्स सॅमसंगचं Exynos 980 प्रोसेसर असून यामध्ये 5G सपोर्ट आहे. यात 4,350 mAh क्षमतेची बॅटरी आहे. दोन्ही स्मार्टफोन Android 9.0 Pie वर आधारित FuntouchOS 10 वर कार्यरत असणार आहेत. Vivo X30 Pro मध्ये क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप असून यातील प्रायमरी कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 13MP चा पेरिस्कोपिक टेलीफोटो सेंसर आणि 32 व 8 मेगापिक्सल क्षमतेचे अन्य दोन सेंसर आहेत. दुसरीकडे, Vivo X30 मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असून याचा रिअर कॅमेराही 64 मेगापिक्सल क्षमतेचा आहे.