दिवाळी आता काही दिवसांवर आलेली आहे. सणासुदीच्या दिवसात घराघरांत उत्साहाचं वातावरण असतं, आपलं मन प्रसन्न असतं. असं असलं तरी खाण्यापिण्याचं गणित मात्र बिघडतं आणि त्याचा परिणाम आपल्या वजनावर होतो. अशा दिवसांमध्ये बरेचजण आपल्या आहाराकडे फार लक्ष देत नाहीत. मग ते गोडाचे पदार्थ असूदे किंवा चमचमीत पदार्थ. वेगवेगळे पदार्थ खाण्याच्या प्रमाणामध्ये आपोआपच वाढ होते.
सणासुदीच्या काळात घरी पाहुणे आलेले असतात, रात्री उशिरापार्यंत जागरण होतं किंवा कधीतरी पहाटे उठावं लागतं; त्यामुळे व्यायाम वा कुठल्याही प्रकारचे हलके व्यायामदेखील केले जात नाहीत. म्हणून अशा सणांमध्ये काहींना पोटदुखीचा त्रास, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.
चालण्यासारखा दुसरा व्यायाम नाही असं म्हणतात ते अगदी योग्य आहे. कारण चालण्याच्या व्यायामासाठी तुम्हाला इतर कुठल्याही गोष्टीची गरज नसते आणि हा कुठेही पटकन करता येणारा प्रकार आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवाळीत तुम्ही स्वतःचं वजन कमी करण्यासाठी चालण्याच्या व्यायामाचा उपयोग करून घेऊ शकता.
हेही वाचा : विविधतेने नटलेली दिवाळी; पंजाबपासून, गोव्यापर्यंत अशी साजरी केली जाते दिवाळी!
“दिवाळी हा सण आपल्या घरात उत्साह, आनंदाचं वातावरण घेऊन येत असतो. पण, अशा वेळेस आपल्या आहाराकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो, व्यायामदेखील बंद होतो. परिणामी, सणांनंतर वजन वाढण्याची समस्या उद्भवते. पण, अशा प्रकारच्या गोष्टी टाळण्यासाठी रोज चालण्याच्या व्यायामाने मदत होऊ शकते. नियमित चालण्यामुळे नको असलेल्या कॅलरीज जाळण्यास मदत होते”, असं एमबीबीएस आणि आहारतज्ज्ञ [MBBS and Nutritionist] डॉक्टर रोहिणी पाटील म्हणतात.
सणासुदीच्या काळात किती पावलं चालायचं याचं ध्येय निश्चित करा :
सण साजरा करताना तुम्ही स्वतःसाठी किती पावलं चालायचं याचा एक आकडा ठरवा, असं डॉक्टर रोहिणी सांगतात. साधारण १० हजार पावलं चालली गेली पाहिजेत असं म्हटलं जातं. परंतु, हा आकडा व्यक्ती, वय आणि तुम्हाला किती वजन कमी करायचं आहे? या गोष्टींनुसार बदलतो.
“तुम्ही किती पावलं चालणं गरजेचं आहे, हे तुमच्या फिटनेसवर आणि तुम्हाला किती जमणार आहे यावर अवलंबून असतं. तुम्ही जर दररोज व्यायाम करत असाल तर जास्त पावलांचं ध्येयं ठेऊन स्वतःला आव्हान देऊ शकता. परंतु, ज्यांना सुरुवात करायची असेल अशांनी छोटं ध्येयं निवडून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दिवाळीमध्ये भरपूर वेळ चालण्याचा मिळेलंच याची खात्री देता येत नाही. त्यामुळे दिवसभराचं नियोजन करा आणि त्यानुसार चालण्यासाठी तुम्हाला किती वेळ देता येईल ते ठरवा”, असं डॉक्टर पाटील सुचवतात.
डॉक्टर पाटील यांनी सणासुदीच्या काळात चालण्याच्या व्यायामाचं महत्त्व आणि काही टिप्स सांगितल्या आहेत त्यादेखील बघू :
अधिक चालण्याचा प्रयत्न करा :
सणांदरम्यान लिफ्टऐवजी जिन्याचा वापर करा. गाडी पार्क करायची असल्यास, दारापासून थोडी लांबवर उभी करा, म्हणजे गाडीपासून दारापर्यंत आपोआप फेरी मारली जाईल. जेवण झाल्यानंतर घरच्यांसोबत, मित्रांसोबत शतपावली घाला.
इंटरव्हल वॉकिंग
या प्रकारात पाच.सहा मिनिटं तुमच्या नेहमीच्या वेगात चालायला सुरुवात करून, नंतर ३० सेकंदांसाठी चालण्याचा वेग वाढवून भराभर चालायचं असतं. असे केल्याने जास्त प्रमाणात कॅलरी जाळण्यास मदत होते.
नियमितता हवी
कोणतीही गोष्ट करताना त्यामध्ये नियमितपणा असेल तर त्याला अर्थ असतो. तसंच चालण्याबद्दलदेखील आहे. दररोज न चुकता जर चालण्याचा व्यायाम केलात तरंच तुम्ही तुमच्या अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे पहाटे किंवा दिवसभरात वेळ झाला नाही तर रात्री फेऱ्या मारा.
चालण्याच्या व्यायामाचे फायदे
१. कॅलरी जाळण्यास मदत होते
चालण्याच्या व्यायामाने कॅलरी जाळण्यास मदत होते. म्हणून सणांमध्ये चालण्याच्या व्यायामाने तुमच्या वजनावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
२. ताण कमी करण्यास मदत होते
मेंदूवर ताण आला असले तर चालण्याच्या व्यायामाने तो कमी होण्यास मदत होते. तुमचा मूड चांगला होतो, मनातील अनावश्यक विचार दूर होतात.
३. मित्रांना, घरच्यांना वेळ देता येतो
रोजच्या घाई-गडबडीच्या आयुष्यातून थोडा वेळ काढून जर मित्रांसोबत किंवा घरच्यांसोबत तुम्ही चालायला गेलात, तर त्यांनादेखील वेळ दिला जातो.
शेवटी “चालण्यासारखा सोपा आणि उत्तम व्यायाम नाही. या व्यायामाने अशा सणासुदीच्या काळात तुमचं आरोग्य उत्तम राहतं. आपल्याला जमेल, झेपेल असं ध्येयं ठेवलं आणि ते पूर्ण केलंत तर सणांमध्ये तुम्ही आरोग्याची काळजी न करता अगदी बिनधास्तपणे सण साजरा करू शकता”, असंदेखील डॉक्टर रोहिणी पाटील म्हणतात.