नियमित अक्रोड खाल्ल्यामुळे चयापचयाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळून मधुमेहाचा संभाव्य प्रसार दर कमी करता येऊ शकतो, असा दावा संशोधकांनी एका अभ्यासात केला आहे.
हा अभ्यास ‘न्यूट्रिशन रिसर्च अॅन्ड प्रॅक्टिस’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. नियमित अक्रोड खाल्ल्याने हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन (एचडीएल) किंवा चांगल्या कोलेस्ट्रॉलमध्ये वाढ होऊन चयापचयाच्या प्रक्रियेला अधिक चालना मिळते आणि रक्तातील शर्करेची पातळी कमी करण्यास मदत होते. दररोज अक्रोड खाल्ल्यामुळे हिमोग्लोबिन ए१सी (एचबीए१सी) आणि एडिपोनेक्टीनची पातळी प्रसारित होत असल्याने मधुमेह होण्याची संभाव्यता कमी होण्याची शक्यता निर्माण होते.
एचबीए१सी ही मागील दोन ते तीन महिन्यांतील रक्तातील शर्करेची सरासरी पातळी आहे. ३० ते ५५ वर्षे वयोगटातील ११९ लोकांचे दोन गटांत विभाजन करून हा अभ्यास करण्यात आला. पहिल्या गटात सहभागी झालेल्यांना १६ आठवडय़ांसाठी अल्पोपाहारात ४५ ग्रॅम अक्रोडचे सेवन करण्यासाठी सांगितले, तर दुसऱ्या गटाला ब्रेड खाण्यास सांगितले. १६ आठवडय़ांनंतर दोन्ही गटांना सहा आठवडय़ांसाठी विश्रांती देण्यात आली. या दरम्यान त्यांनी त्यांच्या आवडीप्रमाणे अन्नपदार्थाचे सेवन केले. विश्रांती कालावधीनंतर पहिल्या गटाला ब्रेडचे सेवन करण्यास सांगितले आणि दुसऱ्या गटाला अक्रोडचे सेवन करण्यास सांगितले. या दरम्यान लिपिड, एचबीए१सी, एडीपोनेटीन, लेपटिन, अॅपोलिपोप्रोटीन बी, अॅन्थ्रोपोमेट्रिक आणि बायोइम्पेडेन्स माहितीचे अभ्यासादरम्यान चार वेळा मूल्यमापन करण्यात आले. या अभ्यासाच्या रचनेमुळे अत्यंत अचूक माहिती मिळण्यास मदत झाल्याचे आयसीएएन पोषण शिक्षण आणि संशोधनाचे प्रमुख ह्युन-जीन पार्क यांनी सांगितले. अभ्यासात चयापचय क्रिया, रक्तदाब, रक्तशर्करा, कोलेस्ट्रॉल पातळी, पोटाचा घेर आणि ट्रायग्लिसराइड्स यामध्ये सुधारणा झाल्याचे संशोधकांना आढळले.