अनेक मुले टीव्हीला चिकटून बराच वेळ कार्यक्रम बघत असतात, पण रोज तीन तास टीव्ही पाहिल्याने मधुमेहाची शक्यता मुलांमध्ये जास्त वाढते, असे एका अभ्यासात म्हटले आहे. संशोधकांच्या मते जास्त काळ टीव्ही पाहणे किंवा संगणकासमोर बसून राहणे यामुळे शरीरातील चरबी वाढते व इन्शुलिन संवेदनशीलता कमी होते. टीव्ही किंवा संगणकापुढे तीन किंवा त्यापेक्षा अधिक तास बसून राहिल्याने मुलामुलींना कमी वयात टाइप २ मधुमेह होतो. लंडनच्या सेंट जॉर्ज्स युनिव्हर्सिटीच्या ‘क्लेअर नाइटिंगेल’ यांनी हे संशोधन केले आहे. लंडन, बर्मिगहॅम व लिसेस्टरच्या ९ ते १० वयोगटातील ४५०० मुलांची पाहणी यात करण्यात आली. या मुलांची चयापचयाची क्रिया व हृदयविकाराची जोखीम, रक्तातील मेद, इन्शुलिन प्रतिरोध, उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण, रक्तदाब व शरीरातील मेद या घटकांच्या आधारे तपासणी करण्यात आली. टीव्ही, संगणक, गेम कन्सोल्स या सगळ्यांसाठी मुले जो वेळ देतात, तो यात विचारात घेतला आहे. एकूण ४५०० मुलांनी या अभ्यासास २००४ ते २००७ दरम्यान प्रतिसाद दिला. त्यात शारीरिक व्यायामाच्या घटकाची माहिती २०३१ मुलांबाबत उपलब्ध होती. २८ टक्के मुलांनी ते १ ते २ तास टीव्ही बघतात असे सांगितले. १३ टक्के मुले २ ते ३ तास तर १८ टक्के मुले तीन तासांपेक्षा जास्त काळ टीव्ही किंवा संगणक वापरणारी होती. तीन तासांपेक्षा जास्त काळ टीव्ही पाहणाऱ्या मुलांचा बॉडी मास इंडेक्स जास्त होता. त्यांच्यात इन्शुलिनला प्रतिरोध करणारे लेप्टिन हे संप्रेरक जास्त प्रमाणात होते. एकूणच त्यांच्यात टाइप २ मधुमेहाची शक्यता वाढलेली होती. आजच्या काळात स्मार्टफोन व टॅबलेटच्या वापरानेही तसेच परिणाम होत आहेत, असे नाइटिंगेल यांचे म्हणणे असून हे संशोधन ‘जर्नल अर्काइव्हज ऑफ डिसीज इन चाइल्डहूड’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे.

Story img Loader