प्रत्येक ऋतूमध्ये आपल्या त्वचेची काळजी घेण गरजेच आहे. आपल्या सर्वांचे त्वचेचे प्रकार भिन्न आहेत. त्याच नुसार त्वचेची वेगवेगळ्या पद्धतीने काळजी घेण्याची आवश्यकता आहे. त्वचेची काळजी घेताना जास्त खास परिश्रम घेण्याची गरज नसते. तुम्ही तुमच्या रोजच्या दिनचर्येमध्ये सहज तुमच्या त्वचेची काळजी घेऊ शकता. पावसाळ्यात त्वचेवर सातत्याने पाणी पडत असते. अशावेळी त्वचेच्या समस्या जाणवू शकतात. त्यावर उपाय करणे गरजेचे असते. तसेच आपल्याकडून पावसाळ्यात कमी पाणी प्यायले जाते. त्यामुळे त्वचेला जास्त नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणून पावसाळ्यातही आवर्जून जास्त पाणी प्या. अशाच काही टिप्सची यादी खाली देत आहोत.
निरोगी त्वचेसाठी करा हे उपाय!
१. आपला चेहरा नेहमी धुतो त्यापेक्षा जास्त वेळा पावसाळ्यात धुवा. त्वचा तेलकट असेल तर चेहऱ्यावर मुरुम, व्हाइटहेड्स आणि ब्लॅकहेड्स जास्त प्रमाणात असतात. तोंड जास्त वेळा धुतल्यामुळे आपली त्वचा निरोगी होण्यास मदत होते.
२. प्रत्येक आठवड्यातून एकदा किंवा दोनदा आपली त्वचा एक्सफोलिएट करणे आवश्यक आहे. त्यासाठी आवर्जून वाफ घ्या.
३. प्रवास करताना नेहमी ओल्या टीशूपेपरचे एक पॅकेट आपल्याबरोबर ठेवा. जेणेकरुन आपण नियमितपणे आपला चेहरा स्वच्छ करू शकतो. यामुळे आपल्या चेहऱ्यावरची धूळ पटकन काढून टाकण्यास मदत होईल.
४. नेहमी स्वत: ला हायड्रेटेड ठेवा. चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी पाण्याची आवश्यकता असते. म्हणून बाहेर असल्यास पाण्याची बाटली सोबत असू द्या. दररोज किमान ३ लिटर पाणी प्या.
५. हेवी मॉइश्चरायझर्स आणि तेल-आधारित सीरम वापरणे टाळा. त्याऐवजी पाण्यावर आधारित सीरम आणि जेल-आधारित मॉइश्चरायझर्सची निवड करा. असे सीरम आणि मॉइश्चरायझर्स त्वचेला सुकलेली ठेवण्यास मदत करतील आणि त्वचेवरील तेल व घाम कमी करतील.
६. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल आणि आलेला घाम वेळच्या वेळी पुसा. पावसाचे पाणी पडल्यास आवर्जून त्वरित चेहऱ्यावरचे पाणी पुसा.
७. इंटरनेटवरील डीआयवाय (DIY) व्हिडिओंवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. कच्चे टोमॅटो, लिंबू इत्यादी थेट आपल्या त्वचेवर लावल्यास वेगळ्या परिणाम होऊ शकतात.