मुखपट्टी (मास्क) ही सध्या जगभरातील जवळजवळ प्रत्येक व्यक्तीसाठी दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाची वस्तू झाली आहे. आता मुखपट्टीशिवाय घराबाहेर पडणे म्हणजे आपले पैशाचे पाकीट न घेता घराबाहेर पडण्यासारखे आहे. मुखपट्टीच्या वापरासंबंधीची अनेक चर्चा अजूनही इंटरनेटवर होत आहेत आणि आता कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी मुखपट्टी वापरण्याचे एक आश्चर्यकारक कारण शोधले आहे. या तज्ञांनी एक नवीन संशोधन प्रकाशित केले आहे. मुखपट्टी घातलेली व्यक्ती अधिक आकर्षक दिसते असे या संशोधनात सांगण्यात आले आहे.
कॉग्निटिव्ह रिसर्च: प्रिन्सिपल्स अँड इम्प्लिकेशन्स या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात, वेगवेगळ्या मुखपट्ट्या ४० पुरुषांच्या चेहऱ्यांची आकर्षकता कशाप्रकारे बदलू शकतात, याबद्दल अभ्यास करण्यात आला आहे. इतर प्रकारच्या मुखपट्ट्यांपेक्षा निळे वैद्यकीय मुखपट्ट्या चेहऱ्याची आकर्षकता आधी वाढवतात असे देखील या अभ्यासातून समोर आले आहे.
ओमायक्रॉन संक्रमणापासून बचाव करायचा आहे? तर ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश कराच
या साथीच्या आजारापूर्वी करण्यात आलेल्या संशोधनात वैद्यकीय मुखपट्टीमुळे चेहऱ्याची आकर्षकता कमी होत असल्याचे आढळून आले आहे असे कार्डिफ विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सायकॉलॉजीचे वाचक आणि चेहऱ्यांच्या मानसशास्त्रातील तज्ञ, डॉ. मायकेल लुईस यांनी सांगितले. तथापि, मुखपट्टी ही सर्वांच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग बनल्यानंतर संशोधकांच्या टीमला हे संशोधन करायचे होते.
कार्डिफ युनिव्हर्सिटीच्या ब्लॉग पोस्टनुसार, “आमच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की जेव्हा वैद्यकीय मुखवटे घातले जातात तेव्हा चेहरे सर्वात आकर्षक मानले जातात. याचे कारण असे असू शकते की हल्ली आम्ही निळे वैद्यकीय मुखपट्टी घालणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सातत्याने संपर्कात असतो आणि आम्ही या क्षेत्रातील लोकांशी अधिक जोडले गेले आहोत. ज्या वेळी आपल्याला असुरक्षित वाटते, तेव्हा आपल्याला वैद्यकीय मुखपट्टी घालणे आश्वासक आणि सकारात्मक वाटू शकते.” अशी टिपण्णी डॉ. लुईस यांनी केली आहे.
थायरॉइडचा त्रास आहे? मग त्वरित बंद करा ‘या’ भाज्यांचा आहारातील समावेश
त्यांनी पुढे सांगितले, “आम्हाला असेही आढळले आहे की मुखपट्टी घातलेले चेहरे हे मुखपट्टी न घातलेल्या चेहऱ्यांपेक्षा अधिक आकर्षक मानले जातात. चेहऱ्याच्या खालील भागातील काही त्रुटी लपवणे शक्य झाल्याचा हा परिणाम असू शकतो. पण हा परिणाम आकर्षक आणि कमी आकर्षक अशा दोन्ही लोकांमध्ये पाहायला मिळाला.” युकेमध्ये मुखपट्टीचा वापर अनिवार्य केल्यानंतर जवळपास ७ महिन्यांनी म्हणजेच फेब्रुवारी २०२१मध्ये हे संशोधन करण्यात आले.
“या संशोधनातून असे निदर्शनास आले आहे की मुखपट्टी घालणाऱ्या लोकांकडे आपण कोणत्या पद्धतीने पाहतो याबद्दल आपले मानसशास्त्र बदलले आहे. जेव्हा आपण एखाद्याला मुखपट्टी घातलेली पाहतो तेव्हा आपल्याला असे वाटत नाही की त्या व्यक्तीला आजार आहे, मला दूर राहण्याची गरज आहे. आता लोकांच्या मानसिकतेत मोठा बदल झाला असून या मुखपट्ट्या कोणत्याही रोगाचे संकेत देण्याचे काम करत नाही.’ असे डॉ. लुईस यांनी स्पष्ट केले.