कंबरेचा पट्टा अतिशय घट्टपणे बांधणाऱया लठ्ठ व्यक्तींना घशाचा कर्करोग होण्याची शक्यता अधिक असते, असे युरोपमध्ये झालेल्या संशोधनात आढळून आले. सर्वसाधारण वजन असलेली व्यक्ती जरी कंबरेचा पट्टा खूप घट्ट बांधत असेल, तर तिलाही हा धोका असतो, असेही संशोधकांना आढळले. मात्र, त्याचे प्रमाण अत्यल्प असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ग्लासगो व स्ट्रॅचक्लाईड विद्यापीठातील आणि सदर्न जनरल रुग्णालयातील डॉक्टरांनी एकूण २४ निरोगी तरुणांवर हे संशोधन केले. लठ्ठ व्यक्तीने कंबरेचा पट्टा खूपच घट्ट बांधला, तर तिच्या पोटातील आम्लद्रव घशाच्या दिशेने सरकण्याची शक्यता असते. याचमुळे संबंधित व्यक्तीला घशाचा कर्करोग होऊ शकतो, असे संशोधकांनी म्हटले आहे. शरीराच्या कंबरेजवळ कोणतीही वस्तू घट्ट बांधू नये, त्याचा शरीरावर दुष्परिणाम होतो, असेही संशोधकांनी स्पष्ट केले.
संशोधनात सहभागी झालेल्या २४ निरोगी तरुणांपैकी निम्मे तरुण हे लठ्ठ होते. उर्वरित तरुणांचे वजन सर्वसाधारण होते. या सर्वांचे जेवण झाल्यानंतर त्यांच्या पोटातील आम्लद्रवाच्या उर्ध्वगमनाचा अभ्यास संशोधकांनी केला. संबंधित व्यक्तीने कंबरेचा पट्टा घट्ट बांधला असेल, तर काय होते आणि पट्टा बांधलाच नसेल, तर त्याचा पोटातील आम्लद्रवावर काय परिणाम होतो, याचीही नोंद संशोधकांनी घेतली. त्यातूनच त्यांना लठ्ठ व्यक्ती जर कंबरेचा पट्टा घट्ट बांधत असेल तर तिला घशाचा कर्करोग होण्याची शक्यता असल्याचे आढळून आले. सर्वसाधारण वजन असलेल्या व्यक्तींमध्येही ही शक्यता कमी प्रमाणात असते, असेही संशोधकांना दिसले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा