Weight Loss In Summer Season: उन्हाळा सुरु आहे. वातावरणामध्ये झालेला बदल प्रत्येकजण अनुभवत आहे. हिवाळ्याच्या थंड दिवसांमध्ये अनेकांचे वजन वाढत जाते. जसजसा उन्हाळा जवळ येतो, तस लोकांना त्यांच्या वाढलेल्या वजनामुळे टेन्शन यायला लागते. हे वाढलेले वजन कमी करण्यासाठी उन्हाळा हा परफेक्ट टाइम असतो असे म्हटले जाते. पण कडक उन्हामुळे घराबाहेर पडून जिमला जाताना किंवा व्यायाम करताना बरेचसे लोक कंटाळा करतात. त्यात उन्हाळ्यामध्ये हाय कॅलरी असलेल्या आईसक्रीम आणि कोल्ड ड्रिंक्समुळे वजन कमी होण्याऐवजी वाढत जाते.
या समस्येपासून वाचण्यासाठी आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी काही सोप्या गोष्टी फॉलो करायला सांगितल्या आहेत. त्या म्हणतात, “उन्हाळा सुरु झाल्यावर लोकांना वाढलेल्या वजनाची समस्या भेडसावू लागते. हिवाळ्यात वाढलेले वजन कमी करण्यासाठी ते प्रयत्न करायला लागतात. व्यायाम करुन जास्त घाम गाळल्याने वजन कमी करता येते असा अनेकांचा समज आहे.”
उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठीच्या ट्रिक्स:
पोहायला जा.
उन्हाळातील गरम-उष्ण वातावरणामध्ये पोहायचा व्यायाम केल्याने शरीर फीट बनते. त्याशिवाय थंड पाण्यामुळे शरीरावर उष्णतेचा फारसा परिणाम होत नाही. पोहताना शरीरातील प्रत्येक स्नायूची हालचाल होत असल्याने याला बेस्ट वर्कआउट म्हटले जाते.
शर्करायुक्त कोल्ड डिंक्सचे सेवन करणे टाळा.
कडक उन्हामुळे लोक कोला, लेमन सोडा, कोल्ड डिंक्स अशा पेयांचे सेवन करतात. या पेयांमध्ये तुलनेपेक्षा जास्त प्रमाणात साखर असते. हाय कॅलरीज असलेल्या कोल्ड डिंक्सच्या सेवनामुळे काही वेळेस डिहायड्रेशनचा त्रास होऊ शकतो. तसेच यामुळे वजन वाढत जाते.
सतत पाणी पित राहा.
पाणी हे जीवन आहे असे आपल्याकडे म्हटले जाते. वजन कमी करण्यासाठीही पाण्याची मदत होते. उन्हाळ्यात व्यायाम करताना घामावाटे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. अशा वेळी डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे ठराविक कालावधीनंतर पाणी पिणे आवश्यक असते. त्याशिवाय पाण्याने पोट भरल्याने आपण कमी जेवतो. परिणामी इनटेक कमी झाल्याने वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.
आणखी वाचा – Hyperhidrosis म्हणजे काय? या आजारामुळे एसीसमोर बसल्यावरही खूप घाम का येत असतो?
चालायला जा.
चालणे हा उत्तम व्यायाम मानला जातो. चालणे अथवा जॉगिंग करणे शरीरासाठी फायदेशीर असते. वजन कमी करण्यासाठीही या व्यायामाची मदत होते. तुम्ही जितका वेळ चालाल, तितक्या प्रमाणात तुमच्या शरीरातील कॅलरीज बर्न होतील.
दह्याचे सेवन करा.
उन्हाळ्यामध्ये पोटदुखीचा त्रास सामान्य असतो. जेवताना विशिष्ट प्रमाणात दह्याचे सेवन केल्याने हा त्रास नाहीसा होऊ शकतो. तसेच यामुळे वजन कमी करण्यासाठी देखील मदत होऊ शकते. पण दही गरम असल्याने ते प्रमाणात खाणे योग्य असते.
कलिंगडाचे सेवन करावे.
कलिंगड हे फळ उन्हाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. या फळाच्या गरामध्ये पाणी असते. शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रणात राहण्यासाठी कलिंगड खाणे फायदेशीर ठरते. लो कॅलरीज फळ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या कलिंगडाचे आपल्याला अनेक फायदे होत असतात. यासह आंबे, द्राक्ष अशी फळे खाणे आरोग्यदायी असते. आहारामध्ये सलादचा समावेश केल्याने वजन नियंत्रणात राहते.