निरोगी आरोग्यासाठी बदाम खाणे चांगले आहे. बदामात फॅटी अ‍ॅसिड्स, प्रोटिन्स, फायबर व व्हिटॅमिन ईची भरपूर मात्रा असते. बदामाचे सेवन केल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. त्याशिवाय शरीरातील हिमोग्लोबिनसुद्धा वाढते. बदाम हे कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
नॅशनल डायबिटीज, ओबेसिटी व कोलेस्ट्रॉल फाउंडेशन सेंटर (NDOC) येथील न्यूट्रिशन रिसर्चच्या डॉ. सीमा गुलाटी सांगतात, बदामातून आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळतात. नियमित पाच बदाम खाल्ले, तर त्याचा आरोग्याला खूप चांगला फायदा झाल्याचे दिसून येते.

वजन नियंत्रित ठेवणे

बदाम खाल्ल्याने तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. बदामामध्ये असलेल्या फायबरमुळे कमी भूक लागते. दररोज सकाळी उपाशीपोटी पाच बदाम पाण्यात भिजवून खाल्ले, तर सकाळी नाश्त्याच्या वेळी तुम्हाला कमी भूक लागेल; ज्यामुळे तुम्ही वजन सहजपणे नियंत्रणात ठेवू शकाल.

हेही वाचा : नीना गुप्ता यांनी घेतला मूग डाळ पराठ्याचा आस्वाद, खरंच मूग डाळ पराठ्यामुळे वजन नियंत्रित करता येते? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

पचनक्रिया सुरळीत करणे

भिजवलेल्या बदामामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात; ज्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. बदामाचे सेवन नियमित केल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊ शकतो.

स्मरणशक्ती वाढते

pharmeasy.in च्या नुसार बदाम खाल्ल्यामुळे आपला मेंदू कार्य करण्यास सक्षम राहतो. त्याशिवाय बदामामुळे आपली स्मरणशक्ती वाढते. बदामामध्ये ओमेगा ३ आणि ओमेगा ६ फॅटी अ‍ॅसिड असतात; जे स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)