Common Reasons of Divorce : प्रसिद्ध रॅपर हनी सिंगचा पत्नी शालिनीबरोबर नुकताच घटस्फोट झाला. ७ नोव्हेंबर रोजी दिल्ली न्यायालयाने हनी सिंग आणि शालिनी तलवार यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.
घटस्फोट म्हणजे पती-पत्नीचे वैवाहिक संबंध कायदेशीररित्या तोडणे होय. तुम्हाला माहिती आहे का, घटस्फोटामागील किंवा पती-पत्नीचे नाते तुटण्यामागील सामान्य कारणे कोणती?
हिंदूस्थान टाइम्सच्या एका वृत्तात मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनैत यांनी पती-पत्नी वेगळे होण्याची काही सामान्य कारणे सांगितली आहेत. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. लग्नानंतर दोन व्यक्ती एका नव्या आयुष्याची सुरुवात करतात. नवरा-बायकोचे नाते जपताना अनेक गोष्टींचा विचार केला जातो. अशावेळी दोन्ही बाजूने नातं जपण्याची ओढ कायम असणे खूप गरजेचे असते.
डॉ. चांदनी तुगनैत सांगतात, “प्रत्येक विवाह हा अनोखा असतो आणि प्रत्येक घटस्फोटामागील कारणही वेगळं असतं. लग्न करताना कुणीही घटस्फोटाचा विचार करत नाही, तरीसुद्धा दरवर्षी हजारो लोकं घटस्फोटाला सामोरे जातात.”
हेही वाचा : पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करायची? हे तीन व्यायाम प्रकार जाणून घ्या, पाहा VIDEO
डॉ. चांदनी तुगनैत यांनी घटस्फोटामागील खालील कारणे सांगितली आहेत.
संवाद संपणे
संवादाची कमतरता हे घटस्फोटाचे सामान्य कारण आहे. जर तुम्ही जोडीदाराबरोबर संवाद साधणे बंद केले तर तुम्ही एकमेकांशी जुळून राहू शकत नाही. एकमेकांना समजून घेण्यासाठी संवाद खूप जास्त आवश्यक आहे.
विश्वासघात
कोणत्याही नात्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असणे खूप जास्त गरजेचे आहे. जोडीदार तुमची फसवणूक करत असेल तर नातं तुटण्याच्या मार्गावर येऊ शकते. कोणत्याही व्यक्तीला प्रामाणिक आणि विश्वासू जोडीदार पाहिजे असतो.
आर्थिक अडचणी
अनेकदा पैशांच्या कमतरतेमुळे मनाप्रमाणे सर्व गरजा पूर्ण होत नाही आणि यामुळेसुद्धा घटस्फोट होऊ शकतो. घरात जर आर्थिक तणाव असेल तर त्याचा थेट परिणाम नात्यावर होतो. जर तुमची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर अनेकदा कुटुंब चालवणे कठीण जाते. अशावेळी जोडीदार वैतागून सोडून जाऊ शकतो.
हेही वाचा : Prostate Cancer : पुरुषांना होणारा प्रोस्टेट कर्करोग कसा ओळखावा? जाणून घ्या, काय आहेत लक्षणे…
प्रेम
नात्यात एकमेकांविषयी काळजी, प्रेम आणि जिव्हाळा असणे आवश्यक आहे. जर असे नसेल तर नाते घटस्फोटाच्या दिशेने जाऊ शकते. कोणत्याही नात्यात पती-पत्नीचे संबंध दृढ असणे खूप जास्त गरजेचे असते.
घरगुती हिंसाचार
घरगुती हिंसाचार हे घटस्फोटाचे सर्वात मोठे कारण आहे. भारतात आजही लग्नानंतर घरगुती हिंसाचाराला बळी पडलेल्या महिलांच्या अनेक घटना समोर येतात. जोडीदार जर सतत मारहाण किंवा शिवीगाळ करत असेल तर अशा वेळी स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी घटस्फोटाकडे वळतात.
डॉ. चांदनी तुगनैत सांगतात, “घटस्फोटामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकी ही खूप सामान्य कारणे आहेत. जर तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत असाल तर तुम्ही तज्ज्ञांशी संपर्क साधावा आणि समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा, यामुळे तुमचे नाते वेळेत सुधारू शकते.”