स्मार्टफोन हा आपल्या रोजच्या जीवनशैलीतील महत्त्वाचा भाग झाला आहे. स्मार्टफोनशिवाय अनेक कामे पूर्ण होऊ शकत नाही. अनेकांना स्मार्टफोन वापरण्याची इतकी सवय होते की ते काही वेळासाठीदेखील त्याशिवाय राहू शकत नाहीत, ही परिस्थिती चिंताजनक आहे. याच संबंधित एक संशोधन समोर आले आहे.

अलीकडील एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, फक्त तीन दिवसांसाठी स्मार्टफोन बंद केल्याने तुमच्या मेंदूच्या कार्यावर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. जर्मनीतील हायडलबर्ग विद्यापीठ आणि कोलोन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले. या संशोधनात १८ ते ३० वयोगटातील २५ तरुणांचा समावेश करण्यात आला होता. सहभागींना ७२ तासांसाठी त्यांचा फोन वापर मर्यादित करण्यास सांगितले होते आणि त्यांना फक्त आवश्यक संवाद आणि कामासंबंधित गोष्टी करण्याची परवानगी देण्यात आली होती.

मोबाईल वापरला नाही तर मेंदूवर काय परिणाम होतो?

ठराविक काळासाठी स्मार्टफोन न वापरण्याला ‘फोन डाएट’ असे म्हटले जाते, तर हे फोन डाएट सुरू करण्यापूर्वी आणि नंतर सहभागींच्या एमआरआय स्कॅन (MRI scans ) आणि मानसिक चाचण्या (psychological tests. ) घेतल्या. फोनचा वापर कमी केल्याने त्यांच्या मेंदूच्या पॅटर्नवर कसा परिणाम होईल हे पाहणे हे यामागील हेतू होता. या चाचणीमध्ये व्यसनसंबंधित न्यूरोट्रांसमीटर प्रणालींशी संबंधित मेंदूच्या सक्रियतेमध्ये (brain activation) बदल दिसून आले.

“सहभागींना स्मार्टफोन न वापरण्याचा काय परिणाम झाला हे तपासण्यासाठी longitudinal approach वापरला,” असे संशोधकांनी त्यांच्या प्रकाशित पेपरमध्ये लिहिले आहे.

स”कालांतराने मेंदूच्या सक्रियतेतील बदल आणि व्यसनाशी संबंधित न्यूरोट्रांसमीटर प्रणालींमधील संबंध आढळून आले.” सहभागींना स्मार्टफोनच्या चित्रांसह विविध प्रतिमा आणि बोटी आणि फुले यांसारख्या काही तटस्थ प्रतिमा दाखवण्यात आल्या.

या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, अगदी अल्पकाळासाठी जरी स्मार्टफोनचा वापर बंद केला तरीदेखील मेंदूच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो. हा निष्कर्ष डिजिटल उपकरणे आपल्या मज्जातंतूंच्या पॅटर्नवर कसा प्रभाव पाडतात यावर प्रकाश पडतो.

या अभ्यासात स्मार्टफोन वापरण्याची इच्छा आणि इतरांशी बोलण्याची इच्छा यांमधील फरक दर्शवता आला नाही, कारण आता या दोन्ही गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या प्रक्रिया आहेत. याबाबत आमच्या संशोधनात काही स्पष्ट निकाल मिळाले असले तरी हा फरक शोधण्यासाठी भविष्यात संशोधन केले जाईल.” असे संशोधकांनी सांगितले