पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच e-RUPI हे प्रीपेड ई-व्हाउचर लॉंच केले आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) हे प्रीपेड ई-व्हाउचर विकसित केले आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज (२ ऑगस्ट) या सेवेचा शुभारंभ करण्यात आला आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले कि, “देशातील डिजिटल व्यवहार आणि डीबीटीला प्रोत्साहन देण्यासाठी ई-रुपी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल.”दरम्यान, ई-रुपी हे डिजिटल पेमेंटचे एक कॅशलेस आणि कॉन्टॅक्टलेस माध्यम आहे. भारताने डिजिटल व्यवहारांना चालना मिळावी यासाठी UPI ही यंत्रणा विकसित केली आहे. तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून आपल्या यूपीआय प्लॅटफॉर्मवर वित्तीय सेवा विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांच्या सहकार्याने ई-रुपी विकसित करण्यात आले आहे. दरम्यान, हे ई-रुपी नेमकं वापरायचं कसं? जाणून घ्या.

e-RUPI म्हणजे काय?

e-RUPI हे क्यूआर कोड किंवा एसएमएस स्ट्रिंग-आधारित एक ई-व्हाउचर आहे. वेलफेअर सर्व्हिसचे लीक-प्रूफ वितरण सुनिश्चित करण्याच्या दिशेने हे एक क्रांतिकारी पाऊल असणार आहे. हे लाभार्थ्यांच्या मोबाइलवर वितरित केले जाते. या वन टाईम पेमेंट यंत्रणेचे वापरकर्ते कार्ड, डिजिटल पेमेंट अॅप किंवा इंटरनेट बँकिंग प्रवेशाशिवाय सर्व्हिस प्रोव्हायडर व्हाउचर रिडीम करू शकतील. ई-रुपीद्वारे व्यवहार पूर्ण झाल्यानंतरच सर्व्हिस प्रोव्हायडरला पैसे दिले जातील. ई-रुपी प्री-पेड असल्याने, सेवा पुरवणाऱ्याला कोणत्याही मध्यस्थांशिवाय वेळेवर पैसे देण्याची ग्वाही देते.

तुम्ही येथे वापरु शकता e-RUPI

e-RUPI चा वापर हा आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, खत अनुदान, इत्यादी योजनांअंतर्गत सेवा पुरवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो. खाजगी क्षेत्रात देखील आपल्या कर्मचारी कल्याण आणि कॉर्पोरेट कार्यक्रमांचा भाग म्हणून या डिजिटल व्हाउचरचा लाभ घेता येऊ शकतो.

e-RUPI चा शुभारंभ करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “केवळ सरकारीच नाही तर कोणत्याही बिगर सरकारी संस्थेला त्याच्या शिक्षणात किंवा वैद्यकीय उपचारात कोणालाही मदत करायची असेल तर ती मदत रोख पद्धतीने करण्याऐवजी तुम्ही ई-रुपी वापरू शकतात. त्यामुळे, तुम्ही दान दिलेली रक्कम पूर्णपणे नमूद केलेल्या उद्देशासाठीच वापरली जात आहे हे सुनिश्चित होईल.”

Story img Loader