अनेकदा आपण घराबाहेर असताना पटकन पाण्याची बाटली विकत घेतो. तीच बाटली आपण घरी घेऊन जातो आणि दररोज त्यामध्ये पाणी भरून बाटलीचा वापर करतो. यामुळे आपण प्लास्टिकची एकदाच वापरलेली बाटली टाकून न देता तिचा पुरेपूर वापर केल्याचे थोडेसे समाधान व्यक्तीला वाटू शकते. मात्र, ही सवय तुमच्यासाठी किती घातक ठरू शकते हे तुम्हाला माहीत आहे का?
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पित असताना त्यामध्ये अतिशय सूक्ष्म अशा ‘मायक्रोप्लास्टिक्स’चा समावेश असतो. प्लास्टिकच्या मोठ्या कचऱ्याचे विघटन केल्यानंतर उरलेल्या प्लास्टिकचे सूक्ष्म घटक, सिंथेटिक कापडातून निघणारे सूक्ष्म प्लास्टिक अशा प्रकारच्या विविध मार्गांमधून आपल्या पिण्याच्या पाण्यात प्लास्टिकच्या तुकड्यांचे घटक आढळू शकतात. हे कण पाच मिलिमीटर्सपेक्षाही कमी आकाराचे असतात.
प्लास्टिकचे असे सूक्ष्म घटक हे समुद्र, तलाव, पिण्याचे पाणी; तसेच आपण ज्या हवेमध्ये श्वास घेतो त्यामध्येही भरपूर प्रमाणात असू शकतात, असे संशोधनातून समोर आले असल्याची माहिती टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखावरून समजते. याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो ते पाहू.
प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिण्याचे शरीरावरील परिणाम
आपण जेव्हा प्लास्टिकच्या बाटलीला तोंड लावून पाणी पित असतो तेव्हा त्या तहान शांत करणाऱ्या पाण्याबरोबर काही प्रमाणात मायक्रोप्लास्टिक घटकदेखील आपल्या पोटात जात असतात. एका अभ्यासात जगातील सर्व पाण्याच्या बाटल्यांमध्ये हा घटक आढळून मनुष्याच्या आरोग्याची तसेच त्याच्या परिणामांची चिंता वाढली आहे. प्लास्टिकच्या बाटल्यांमधून पाणी पिण्याने अनेक घातक रासायनिक घटक आपल्या शरीरात सहज प्रवेश करू शकतात. परिणामी, इन्सुलिन प्रतिकार, वजन वाढणे, प्रजनन क्रियेची पातळी खालावणे आणि कर्करोगासारखे भयंकर आजार होण्याची शक्यता असते. अजूनही या विषयावर अनेक अभ्यास, संशोधने सुरू आहेत. मात्र, यापासून स्वतःचे रक्षण कसे करायचे असा प्रश्न मनात येतो.
प्लास्टिक बाटल्यांचा प्रभाव कमी कसा करावा?
“सर्वप्रथम पाणी पिण्यासाठी स्टेनलेस स्टील, काचेच्या किंवा BPA मुक्त प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करावा. अशा प्रकारच्या बाटल्यांचा वापर हा पर्यावरणासाठी तर चांगला आहेच, मात्र त्यासह आपल्या शरीरात जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिकचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते”, असा सल्ला सर्वांगीण कल्याण प्रशिक्षक [holistic wellness coach], स्वयंपाकासंबंधी पोषणतज्ज्ञ तसेच इट क्लीन विथ ईशांका वाहीने दिला असल्याचे टाइम्स ऑफ इंडियाच्या एका लेखातून समजते.
हेही वाचा : हॉस्टेलच्या मुलींचा भन्नाट जुगाड! Video पाहून तुम्हालाही आठवतील कॉलेजचे दिवस, पाहा…
“तसेच घरामध्ये पाणी स्वच्छ करून देणारी फिल्टरेशन सिस्टम बसवून घ्या, यामुळे सिस्टीममधून तुमच्या घरात येणाऱ्या पाण्यामधील घातक अशुद्ध घटक तसेच मायक्रोप्लास्टिक गाळून घेतले जाईल, त्यामुळे तुमचे पिण्याचे पाणी घातक घटकापासून काही प्रमाणात मुक्त असेल” असेही वाही म्हणतात.
तर यावरून आपण हे लक्षात घेऊ की, प्लास्टिकच्या बाटल्यांमधून वारंवार पाणी पिणे हे शरीरासाठी धोकादायक असू शकते. तसेच या बाटल्यांमुळे प्रदूषणात वाढ होते. समुद्र आणि समुद्री जीवांना याचा सर्वात जास्त त्रास होतो. असे न होण्यासाठी आपण कुठेही जाताना स्वतःची पाण्याची बाटली स्वतःबरोबर ठेवावी. तसेच ती स्टेनलेस स्टील किंवा त्यासारख्या घटकांपासून बनलेली असावी. तसेच बाहेर पाण्याची बाटली विकत घेतल्यानंतर एकदा वापरलेली बाटली वाटेल तिथे न फेकता, त्यासाठी कचऱ्याच्या डब्याचा वापर करावा.