Health Benefits Of Eating Sabja Seeds With Water: बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांच्या आहारामध्ये सब्जाचे सेवन करण्याचं प्रमाण वाढू लागलंय. सब्जाच्या बिया आपल्या शरीरासाठी लाभदायक असतात आणि योग्य प्रमाणात सब्जा खाल्ल्यास आरोग्य निरोगी राहण्यासही मदत मिळते. सब्जामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शिअम, मॅगनिज, मॅग्नेशिअम आणि फॉस्फरस हे घटक भरपूर प्रमाणात असतात. आपल्या डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारे सब्जाच्या बियांचा समावेश केला जाऊ शकतो. सब्जा बियाणे, ज्याला तुळशीचे बियाणे म्हणूनही ओळखले जाते. अलीकडच्या काळात एक सुपरफूड म्हणून याचे सेवन केले जाते. चला तर मग जाणून घेऊयात, आठवडाभर सब्जा बियांचे पाणी पिण्याचे फायदे काय आहेत? पचन सुधारण्यापासून ते वजन कमी करण्यास मदत करण्यापर्यंत त्याचे फायदे असंख्य आहेत. या लेखात आपण आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ यांनी शेअर केल्याप्रमाणे, आठवडाभर सब्जा बियांचे पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत.

सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे

१. सब्जा बियांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ते पचनाच्या आरोग्यासाठी उत्कृष्ट आहे. आहारतज्ज्ञ सांगतात की, आठवडाभर दररोज सब्जा बियांचे सेवन केल्याने पोटफुगी, बद्धकोष्ठता, गॅस आणि आम्लता यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या टाळता येतात, म्हणून जर तुम्हाला तुमचे आतड्यांचे आरोग्य व्यवस्थित ठेवायचे असेल तर सब्जा बियांचे पाणी तुमच्या आहारात समाविष्ट करण्याचा विचार करा.

२. मोनोपॉज आणि पेरीमेनोपॉज हे स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे आहेत, यामुळे स्त्रियांमध्ये शारीरिक आणि भावनिक बदल दिसून येतात. यावेळी एक ग्लास सब्जा बियांचे पाणी आराम देऊ शकते. राष्ट्रीय आरोग्य संस्था (NIH) नुसार, सब्जा बियांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, कारण त्यात ओमेगा-३, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यांचे सेवन केल्याने हार्मोनल संतुलन राखण्यास मदत होते, त्यामुळे अनियमित मासिक पाळीसारखी लक्षणे कमी होतात.

३. सब्जा बियांचे पाणी तुम्हाला उष्माघातापासूनदेखील वाचवू शकते? हो, तुम्ही ते बरोबर वाचले आहे. पोषणतज्ज्ञ स्पष्ट करतात की, सब्जा बियांच्या सेवनानं शरीरात थंडावा निर्माण होतो, ज्यामुळे ते उन्हाळ्यासाठी उत्तम बनतात. त्यांचे पाणी प्यायल्याने उष्माघात निश्चितच टाळता येईल, तर तुम्ही त्यांच्यासोबत स्वादिष्ट स्मूदी किंवा लिंबूपाणीदेखील बनवू शकता.

४. सब्जा बियांचे पाणी मधुमेह व्यवस्थापनासाठीदेखील उत्कृष्ट आहे. NIH च्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, सब्जा बियांमध्ये कार्बोहायड्रेटचे ग्लुकोजमध्ये रूपांतर कमी करण्याची क्षमता असते, ज्यामुळे इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते.

५. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सब्जा बियांचे पाणी तुमचा नवीन मित्र असू शकतो. त्यात फायबरचे प्रमाण जास्त असल्याने ते तुम्हाला जास्त वेळ पोट भरलेले ठेवू शकतात, ज्यामुळे जास्त खाणे टाळता येते. तुमच्या आहारात सब्जा बियांचे पाणी समाविष्ट करणे तुमच्या वजन कमी करण्याच्या आहारासाठी खरोखरच एक गेम-चेंजर ठरू शकते.

सब्जा बियाणे पोटाची चरबी जाळतात का?

संतुलित आहार आणि नियमित व्यायामासह सब्जा बियाणे पोटाची चरबी जाळण्यास मदत करू शकतात. जर तुम्ही फक्त त्यांच्यावर अवलंबून राहिलात तर तुम्हाला अपेक्षित परिणाम दिसणार नाहीत. सब्जा बियाणे तुमच्या आहारात एक उत्तम भर घालतात. सब्जाचे पाणी एकत्र करा आणि पुढील सात दिवस दररोज ते प्या, तुमचे आरोग्य बदलेल, तुम्ही तंदुरुस्त आणि निरोगी राहाल.