Polyamory Relationship : जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर जिवापाड प्रेम करतात; त्याला प्रेमसंबंध, असे म्हणतात. पण, जेव्हा एक व्यक्ती एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर प्रेमसंबंध ठेवत असेल, तर त्या नात्याला काय म्हणावे? तुम्हाला वाटेल की, हे कसे शक्य आहे? जर एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर प्रेमसंबंध ठेवणे म्हणजे फसवणे होय, असे तुम्हाला वाटेल. पण, खरेच याला फसवणूक म्हणायची का? मग या नात्याला नाव काय?
जोडीदाराशिवाय दुसऱ्या कुणाचा विचार करणे कितपत योग्य? अनेकांना हे पटणार नाही. पण, तुम्हाला माहितीये का की, असे नातेसंबंध जपणारे अनेक लोक या जगात आहेत आणि गुण्यागोविंदाने राहत आहेत. बंगळुरूच्या विद्यानपुरा येथील नातेसंबंध तज्ज्ञ, लैंगिक विषयांचे अभ्यासक व मानसोपचार तज्ज्ञ सल्लागार डॉ. पावना. एस. यांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.
पॉलिअॅमरी म्हणजे काय?
डॉ. पावना. एस : पॉलिअॅमरी म्हणजे एका माणसाचे एकापेक्षा जास्त माणसांबरोबर नातेसंबंध असणे, होय. हे नाते उघडपणे जपले जाते. समाजात होणारा बदल, टीव्ही सीरियल, वेब सीरिज व चित्रपट यांतून दाखविले जाणारे नाते आणि पती-पत्नीशिवाय इतर व्यक्तींचे आकर्षण वाटणे यांमुळे पॉलिॲमरीची प्रकरणे दिवसेंदिवस वाढत आहेत.
पॉलिअॅमरीचे प्रकार कोणते?
डॉ. पावना. एस : पॉलिअॅमरीचे अनेक प्रकार आहेत. त्यात तीन मुख्य प्रकार दिसून येतात. पहिल्या प्रकारात व्यक्ती इतर नात्यांना सोडून फक्त एका विशिष्ट नात्यालाच महत्त्व देते. दुसऱ्या प्रकारात व्यक्ती सर्व नात्यांना समान वागणूक देते आणि तिसऱ्या प्रकारात एखादी व्यक्ती सामाजिक बंधनांचा विचार न करता, फक्त नाते पुढे नेण्याचा प्रयत्न करते.
पॉलिअॅमरस लोकांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते?
डॉ. पावना. एस : जेव्हा एकाच वेळी अनेक व्यक्तींबरोबर प्रेमसंबंध ठेवले जातात तेव्हा नात्यात संवाद कमी होणे, मत्सर वाटणे व वेळेचे व्यवस्थापन करणे इत्यादी गोष्टी पॉलिअॅमरस व्यक्तींसाठी आव्हान ठरू शकतात. या नात्याला कायदेशीर मान्यता मिळणे आणि कुटुंबाने हे नातेसंबंध स्वीकारणे हेसुद्धा खूप मोठे आव्हान आहे. अशा वेळी या समस्या दूर करण्यासाठी उघडपणे संवाद करणे, नात्यात सीमा राखणे व पारदर्शकपणे संवाद करून विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
पॉलिअॅमरी नात्यात वचनबद्धतेचा अभाव दिसून येतो, असं म्हणतात. खरं तर पॉलिअॅमरी नातेसंबंध हे विश्वास, संवाद व वचनबद्धतेवरच टिकून असतात. हे नातेसंबंध समजून घेताना स्पष्ट संवाद, नात्याची सीमा ठरविणे, नियमित आत्मचिंतन करणे व नात्यात प्रामाणिकपणा दाखविणे गरजेचे आहे. या नात्यात वावरताना एकमेकांच्या सहमतीचे महत्त्व ओळखा. जोडीदाराच्या भावनांचा आदर करा. चांगले आणि दीर्घकाळ पॉलिअॅमरी नातेसंबंध टिकविण्यासाठी जोडीदारांबरोबर नियमितपणे संवाद साधणे गरजेचे आहे.
हेही वाचा : Thyroid and Weight : थायरॉइडमुळे लठ्ठपणा आलाय? थायरॉइडग्रस्त लोकांनी वजन नियंत्रणात कसे ठेवावे?
जोडीदाराचा कंटाळा आलाय म्हणून अन्य कुणी आवडणे याला ‘पॉलिअॅमरी’ म्हणता येणार का?
डॉ. पावना. एस : जोडीदाराचा कंटाळा आलाय म्हणून अन्य कुणी आवडणे याला ‘पॉलिअॅमरी’ म्हणता येणार नाही. कारण- हे नाते एकापेक्षा जास्त व्यक्तींबरोबर सहमतीने आणि प्रामाणिकपणे जपले जाते. जोडीदाराचा कंटाळा आला म्हणून पॉलिॲमरी नातेसंबंध ठेवल्यामुळे नात्यातील आदर आणि महत्त्व कमी होते.
पॉलिअॅमरीमध्ये एकाहून अधिक व्यक्तींवर ‘समान प्रेम’ केले जाते का?
डॉ. पावना. एस : पॉलिअॅमरी नातेसंबंधात समान प्रेमापेक्षा प्रामाणिकपणा आणि सहमतीला अधिक महत्त्व दिले जाते. जोडीदार एका चांगल्या व्यक्तीच्या शोधात असू शकतो; पण भावनांमध्ये चढ-उतार येतत आणि प्रत्येक नात्यात प्रेम वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केले जाते. इतर जोडीदाराबरोबर वैयक्तिक संबंध आणि त्यांच्या गरजांचा आदर केला, तर एक चांगले उत्तम नाते निर्माण होऊ शकते.
पॉलिअॅमरी नातेसंबंधात कोणती कायदेशीर आव्हाने येतात?
डॉ. पावना. एस : पॉलिगॅमी नात्यांना कोणतीही कायदेशीर मान्यता नाही. जेव्हा पॉलिअॅमरस व्यक्ती लग्नबंधनात अडकते (पॉलिगॅमी नात्यात येणे) तेव्हा त्या व्यक्तीला कोणतेही कायदेशीर अधिकार मिळत नाहीत. कुटुंबातील वारसा हक्काचा या नात्याला लाभ घेता येत नाही. कारण- हे नाते कायद्याच्या चौकटीत बसत नाही.
लैंगिक इच्छा भागविण्यासाठी पॉलिअॅमरस होणे कितपत योग्य?
डॉ. पावना. एस : लैंगिक इच्छा भागविण्यासाठी पॉलिअॅमरस होणे चुकीचे आहे. त्यामुळे नात्यातील भावना, आदर व संवादावर याचा परिणाम होतो. केवळ लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी पॉलिॲमरी नातेसंबंधात येणे म्हणजे या नात्याचे महत्त्व कमी करणे होय.
पॉलिअॅमरीमध्ये ‘भावनिक साक्षरता’ (इमोशनल लिटरसी) किती महत्त्वाची वाटते?
डॉ. पावना. एस : पॉलिअॅमरी नातेसंबंधामध्ये भावनिक साक्षरता खूप महत्त्वाची आहे. हे नाते समजून घ्यायला भावनिक साक्षरता मोलाची ठरते. या नात्यात समोरच्याची भावना समजून घेणे, वेळोवेळी जोडीदारासमोर स्पष्टपणे व्यक्त होणे आणि नाते दीर्घकाळ जपणे खूप गरजेचे आहे. स्पष्ट संवाद, एकमेकांप्रति सहानुभूती, एकमेकांचे ऐकून घेणे यांमुळे नात्यातील विश्वास आणखी दृढ होतो आणि संबंध मजबूत होतात. त्यामुळे भावनिक साक्षरतासुद्धा वाढते. जर भावनिक साक्षरता नसेल, तर पॉलिअॅमरी नातेसंबंध समजून घेणे कठीण जाते.