भारतात पार्टी ड्रग म्हणून बदनाम असलेले केटामाईन हे ड्रग आत्महत्येच्या विचारांपासून परावृत्त करण्यास उपयुक्त असल्याचे संशोधनातून समोर आले आहे.
धकाधकीच्या जीवनात अनेक लोक नैराश्याचे शिकार बनत आहेत. तसेच प्रदीर्घ आजारपणातूनही रुग्ण नैराश्येत जात असतात. यातून ते स्वत:ला हानी पोहोचेल असे कृत्य करतात. तसेच आत्महत्येचे पाऊलही उचलतात. यापासून त्यांना वाचविण्यासाठी हेल्पलाइन जरी असल्या तरी त्या प्रभावी ठरत नाहीत. या मानसिकतेवर कोलंबिया विद्यापीठाच्या वैद्यकीय शाखेने संशोधनातून केटामाईन या ड्रगची थोडीशी मात्रा आत्महत्येच्या विचारांना काही तासांत रुग्णाच्या मनातून घालवत असल्याचे समोर आले आहे.
सध्या अस्तित्वात असलेली नैराश्यातून बाहेर काढणारी औषधे काही आठवडय़ांसाठी घ्यावी लागतात. त्यानंतर रुग्णाचे आत्महत्येचे विचार कमी होण्यास मदत होते. मात्र केटामाईन हे काही तासांतच काम करीत असल्याचे विद्यापीठाचे मिशेल ग्रुनेबाम यांनी सांगितले. हे रुग्ण जेव्हा एखाद्या समस्येतून आत्महत्येचा शेवटचा पर्याय स्वीकारतात तेव्हा त्यांना तातडीने या विचारांपासून परावृत्त करण्याची गरज असते. सध्या तात्काळ परिणाम देणारी कोणतीही उपचार पद्धती अस्तित्वात नसल्याचे ते म्हणाले. केटामाईन संयुक्त औषधाचा प्रयोग आत्महत्येचा विचार करणाऱ्या ८० जणांवर करण्यात आला. पुढील २४ तासांत या रुग्णांमध्ये आत्महत्येचे विचार कमी झाल्याचे अभ्यासाअंती आढळून आले. तसेच त्यांच्या मनाचे आरोग्य वाढण्यासोबतच नैराश्य आणि थकवाही कमी झाल्याचे समोर आले आहे.