Mono Diet For Weight Loss: वाढलेल्या वजनामुळे मधुमेह, रक्तदाब यांच्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. योग्य वेळी काळजी घेतली नाही तर मग प्रकरण जिवावर बेतू शकते. असे घडू नये या उद्देशाने लोक वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करीत असतात. वजन कमी करण्यासाठी Mono Diet हा पर्याय वापरतात. आजकाल वाढलेल्या वजनाला त्रासलेली मंडळी हा नवा उपाय करीत असल्याचे पाहायला मिळते. पण खरोखरच मोनो डाएट करणे शरीरासाठी खरेच फायदेशीर असते का?
Mono Diet म्हणजे काय?
Monotrophic Diet याचे संक्षिप्त स्वरूप म्हणजे मोनो डाएट (Mono Diet) असे आहे. मोनो डाएट फॉलो करताना कित्येक दिवस/ आठवडे एकाच पद्धतीचे खाद्यपदार्थ खावे लागतात. तुम्ही केळी, अंडी, फळे, पालेभाज्या अशा कोणत्याही पदार्थाला मोनो डाएटमध्ये समाविष्ट करू शकता. पण निवडलेला पदार्थ तुम्हाला सलग काही दिवसांसाठी खावा लागेल. या डाएटमध्ये ‘ठरवलेल्या कालावधीपर्यंत एकच पदार्थ दररोज खाणे’ हा एकमेव नियम असतो.
मोनो डाएटचे फायदे
जे लोक मोनो डाएटचे समर्थन करतात, ते यामुळे वजन लवकर कमी होते असा दावा करतात.
यामध्ये एकच गोष्ट नियमितपणे खायची असते. त्यामुळे मोनो डाएटसाठी जास्त खर्च होत नाही असे लोक म्हणत असतात.
मोनो डाएट केल्याने कॅलरीज इनटेकचे प्रमाण कमी होते. हे डाएट करताना व्यायाम केल्याने अधिक फायदा होतो.
मोनो डाएटमुळे शरीराला फायदा होत असला, तरी त्याचे काही दुष्परिणामदेखील आहेत. वजन कमी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या या उपायामुळे शरीराला अपाय होण्याची शक्यता असते.
मोनो डाएटमुळे होणारे तोटे
मोनो डाएट फॉलो करीत असताना दिवसाला एकच पदार्थ एकदाच खायचा असतो. दररोज एका वेळी जेवण केल्याने कॅलरीजचे प्रमाणदेखील कमी होऊ शकते. यामुळे शरीरामध्ये सूज येऊ शकते. तर काही वेळेस स्नायूंचे नुकसान होऊ शकते.
यामध्ये एकच पदार्थ खायचा असा नियम असल्याने अन्य खाद्यपदार्थ खाण्याची सतत इच्छा मनामध्ये निर्माण होऊ शकते.
मोनो डाएट केल्याने जलदगतीने वजन कमी होत जाते. परिणामी डोकेदुखी, डिहायड्रेशन यांच्यासह कुपोषण, थकवा अशा समस्या होण्याची शक्यता असते.
आणखी वाचा – स्विमिंग पूलमध्ये त्वचा टॅन होऊ शकते का? जाणून घेऊया, याबाबतचे तज्ज्ञांचे मत
मोनो डाएट करणे योग्य आहे की अयोग्य?
शरीर सदृढ राहावे यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक असते. विविध पदार्थांमधून मिळणारे अनेक पोषक घटक शारीरिक वृद्धीसाठी गरजेचे असतात. मोनो डाएट प्लॅनमध्ये दिवसातून एकदाच जेवायचे असते. शिवाय तो एकच पदार्थ दररोज खायचा असतो. या नियमांमुळे पोषकतत्त्वे शरीरापर्यंत पोहचत नाहीत. या कारणामुळे लोक मोनो डाएट न करण्याचा सल्ला देतात. वजन कमी करण्यासाठी हा उपाय करण्याऐवजी अन्य पर्यायांचा अवलंब करता येतो, असे तज्ज्ञ सांगतात.