जेव्हा आपण भारतीय लोकांच्या अन्नाबद्दल बोलतो तेव्हा तिथे मसालेदार पदार्थांचा उल्लेख येतो. भारतीय लोकांना मसालेदार अन्न आवडते. भारतीय खाद्यपदार्थ आणि त्यातील मसाले जगभर प्रसिद्ध आहेत. जेवणात मसाला नसेल, तर तो पदार्थ चवीला अगदी साधा असतो आणि भारतीयांना असे पदार्थ खायला आवडत नाहीत. मिरची आपल्या जेवणाची चव वाढवण्याचे काम करते. मिरचीशिवाय आपण कोणत्याही अन्नाचा विचारही करू शकत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का की, लाल मिरचीचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. आजकाल मसालेदार पदार्थ खाण्याची क्रेझ लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांमध्येच वाढली आहे. पण, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. मात्र, त्यातल्या त्यात जर योग्य वेळी मसालेदार अन्न खाल्ले, तर शरीराचे नुकसान होत नाही. ही वेळ कोणती ते आपण जाणून घेऊ.
मसालेदार अन्न आरोग्यदायी आहे का?
मसालेप्रेमींसाठी चांगली बातमी : मसालेदार अन्न फक्त चवदारच नाही, तर त्याचे अनेक आरोग्य फायदेदेखील आहेत.
रोगप्रतिकार शक्तीत वाढ : युनायटेड स्टेट्स डिपार्टमेंट ऑफ ॲग्रीकल्चर (USDA) हे अधोरेखित करते की, हिरव्या आणि लाल मिरचीमध्ये क जीवनसत्त्वासम जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्तीत वाढ होते; जी सामान्य आजारांपासून बचाव करते.
वजन कमी करण्यास मदत : पोषणतज्ज्ञ अंशुल जयभारत म्हणतात की, मसालेदार अन्न वजन कमी करण्यास मदत करू शकते. कारण- ते तृप्तता वाढवते आणि जास्त खाण्यावर नियंत्रण ठेवते.
हृदयासाठी फायदेशीर : मसालेदार अन्नामुळे छातीत जळजळ होऊ शकते; मात्र योग्य प्रमाणात सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल कमी होऊन, जळजळही कमी होते.
मसालेदार अन्न खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती?
मसालेदार अन्न खाण्याची सर्वोत्तम वेळ कोणती? आताच आपण मसालेदार अन्नाचे फायदे समजून घेतले आहेत. मग त्याच्या सेवनाच्या वेळेबद्दलही बोलू. तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही मसालेदार अन्न खाऊ शकता, असे तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. मसालेदार अन्न खाण्याची सर्वोत्तम वेळ ही दुपारची आहे, रात्रीचे मसालेदार अन्न खाल्ल्याने पचनाची समस्या उद्भवू शकते. आयुर्वेदिक आरोग्य प्रशिक्षक डिंपल जांगडा स्पष्ट करतात की, जर तुम्हाला कफ असेल (उदा. सर्दी, खोकला, सायनस समस्या, अॅलर्जी, लठ्ठपणा), तर मसालेदार अन्न फायदेशीर ठरू शकते. कारण- मसालेदार पदार्थ शरीराचे तापमान वाढवतात आणि श्लेष्माचे द्रवीकरण करतात आणि त्यामुळे ही लक्षणे कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा >>कोबीच्या भाजीतील सूक्ष्म किडे काढण्यासाठी ‘या’ तीन सोप्या टिप्स करतील मदत
मसालेदार अन्न कोणी टाळावे?
तुम्हाला आम्लपित्त, जळजळ किंवा पित्ताचा त्रास असेल, तर तज्ज्ञ मसालेदार अन्न टाळण्याचा सल्ला देतात. मसाल्यांच्या तीव्रतेमुळे हे त्रास वाढू शकतात आणि त्यामुळे अस्वस्थता वाढू शकते.
मसालेदार अन्न रात्रीच्या झोपेवर परिणाम करू शकते?
होय! मसालेदार अन्न तुमच्या झोपेवर परिणाम करू शकते. आयुर्वेदिक तज्ज्ञ आशुतोष गौतम स्पष्ट करतात की, रात्रीच्या जेवणात मसालेदार अन्नाचे सेवन करणे स्वाभाविकपणे वाईट नसले तरी रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यांच्यात पुरेशा वेळेचा फरक असणे खूप महत्त्वाचे आहे. मसालेदार अन्नामुळे जठरासंबंधीचा त्रास, अपचन, अस्वस्थता आदींमुळे तुमच्या झोपेत व्यत्यय येऊ शकतो.