What Is The Best Way To Wash Your Face : आजच्या धावपळीच्या काळात लोक अनेकदा त्यांच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत, यामुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात, त्यापैकी एक ‘त्वचेशी संबंधित समस्या.’ योग्य काळजी न घेतल्याने चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ शकते, त्यामुळे त्वचा स्वच्छ ठेवण्यासाठी दररोज चेहरा धुणे खूप महत्त्वाचे असते, यामुळे आपला चेहरा चमकदार आणि तेजस्वी दिसतो.
चेहरा चांगला दिसण्यासाठी अनेकदा आपण चांगले फेसवॉशदेखील वापरतो, जेणेकरून आपला चेहरा ग्लो करेल. पण, चेहरा धुताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे याकडे आपण लक्ष देत नाही. तर तुम्हालाही चेहरा धुण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायची असेल तर अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुम्हाला चेहरा धुण्याची योग्य पद्धत, चेहरा धुताना कोणत्या गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे असते, याबद्दल सांगणार आहोत…
चेहरा धुताना काय लक्षात ठेवावे?
जास्त स्क्रबिंग करू नये
जास्त स्क्रबिंग (चोळल्यामुळे) चेहऱ्यावर जळजळ निर्माण होऊ शकते. याशिवाय, यामुळे त्वचा कमकुवत होते. अशा परिस्थितीत आपण हलक्या हातांनी स्क्रब करावे.
वारंवार चेहरा धुवू नये
जर तुम्ही वारंवार चेहरा धुतलात तर तुमचा चेहरा कोरडा आणि निर्जीव होऊ शकतो. यासाठी दिवसातून कमीत कमी फक्त दोनदा चेहरा धुवा.
गरम पाणी वापरू नका
गरम पाणी त्वचा कोरडी आणि निर्जीव बनवू शकते, त्यामुळे तुम्ही थंड पाणी किंवा सामान्य कोमट पाणी वापरावे.
योग्य फेसवॉश निवडणे
तुमच्या त्वचेच्या रचनेनुसार तुम्ही फेसवॉश वापरावे. जसे की कोरडी त्वचा, तेलकट त्वचा किंवा मुरुम असलेल्या चेहऱ्यांसाठी योग्य फेसवॉश वापरावा.
चेहरा धुतल्यानंतर काय करावे?
चेहरा धुतल्यानंतर सुती कापडाने किंवा टॉवेलने चेहरा पुसून टाका. त्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावा, कारण यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरू नका.