Age for Marriage : ‘या’ वयात करा लग्न; दीर्घकाळ टिकेल नातं; वाचा संशोधन काय सांगते …लग्न हा आयुष्यातील एक असा टप्पा आहे की, जेथे दोन लोक एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करतात. भारतीय समाजात लग्नाला विशेष महत्त्व आहे. सध्या गरज आणि आवडीनुसार लोक त्यांच्या मनाप्रमाणे लग्न करतात; पण तुम्हाला माहिती आहे का की, लग्नाचं योग्य वय कोणतं आहे?
भारतीय कायद्यानुसार, भारतात मुली १८ वर्षांनंतर आणि मुले २१ वर्षांनंतर लग्न करू शकतात. ही वयोमर्यादा बदलण्याची मागणी अनेकदा
करण्यात आली आहे; पण अजूनही त्यावर शिक्कामोर्तब झालेले नाही.
कायद्याचा विचार केला नाही, तर लग्न करण्याचे योग्य वय तेव्हा असते जेव्हा व्यक्ती शारीरिक, मानसिक व आर्थिकदृष्ट्या तयार असते. पण, एका रिसर्चमधून असे समोर आलेय की, एका विशिष्ट वयात लग्न केल्यामुळे नाते दीर्घकाळ टिकते आणि घटस्फोट घेण्याची कधीही वेळ येत नाही. आज आपण याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या …
संशोधन काय सांगते?
यूटा विद्यापीठाचे निक वोल्फिंगर यांनी केलेल्या अभ्यासातून असे समोर आलेय की, ज्या लोकांचे लग्न २८ ते ३२ वयादरम्यान होते, अशा लोकांचे घटस्फोट होण्याची शक्यता कमी असते.
वोल्फिंगर यांनी २००६ ते २०१० आणि २०११ ते २०१३ च्या ‘नॅशनल सर्व्हे ऑफ फॅमिली ग्रोथ’च्या आकड्यांचे विश्लेषण केले. त्यामध्ये असे दिसून आले की, जसजसे वय वाढत जाते, तसतशी घटस्फोटाची शक्यता कमी होऊ शकते; पण वयाच्या ३२ व्या वर्षानंतर लग्न केले, तर घटस्फोटाची शक्यता आणखी पाच टक्क्यांनी वाढू शकते, असेही या आकड्यांमधून समोर आले आहे.
हेही वाचा : Yoga for Children : ५ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांनी करावे ‘हे’ तीन योगा; पालकांनो, फायदे जाणून घ्या
२८ ते ३२ या वयात लग्न करण्याचे फायदे
२८ ते ३२ या वयात लग्न करण्याचे अनेक फायदे आहेत. लग्न करण्याची ही चांगली वेळ असते. कारण- या वयात लोक स्वत:च्या जबाबदाऱ्या उचलू शकतात आणि गरजा समजू शकतात. आर्थिकदृष्ट्याही या वयात लोक सक्षम असतात. त्यामुळे नव्या आयुष्याची करण्यासाठी हे वय योग्य असू शकते.