लग्नाचा सिझन आता संपला असला तरीही वाढदिवस, बारसे, डोहाळजेवण, साखरपुडा यांसारखे लहानमोठे कार्यक्रम सुरुच असतात. स्वत:च्या घरात कार्यक्रम असला किंवा अगदी दुसऱ्यांकडे कार्यक्रमाला जायचे असले तरीही कोणते कपडे आणि काय दागिने घालायचे असा प्रश्न स्त्रियांना पडतो. अशावेळी आपल्याला फॅशनच्या काही सोप्या टिप्स माहित असतील तर त्या निश्चितच उपयोगी पडतात. कोणत्याही प्रकारच्या कपड्यावर सुंदर आणि परिपूर्ण दिसण्यासाठी चांगले दागिने असणे आवश्यक आहे. यातही सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी कोणते दागिने घालावेत याचे काही संकेत असतात, ते पाळल्यास आपण सर्वांमध्ये नक्कीच उठून दिसू शकतो.
साडी किंवा पंजाबी आणि लेहेंगा अशा सर्व प्रकारच्या कपड्यांवर कानात झुमके हा एक उत्तम पर्याय ठरु शकतो. झुमका कुठल्याही प्रकारच्या पारंपरिक पोशाखावर शोभून दिसतो. जर तुम्हाला भरजरी प्रकारची ज्वेलरी न घालता एखाद्या समारंभात जायचे असेल, तर तुम्ही बहुमुखी झुमके ट्राय करु शकता. झुमक्यांच्या अशाच काही प्रकारांवर कॅरेटलेनच्या ज्वेलरी डिझाइन प्रमुख प्रज्ञा म्हस्के यांनी दिलेल्या काही सोप्या टिप्स जाणून घेऊया.
कार्यालयीन पार्टीसारख्या प्रसंगासाठी आपण निश्चितपणे आधुनिक आभूषणे जसे की कॉकटेल रिंग्ज निवडू शकता. कॉकटेल रिंगसह तुम्ही मोहक तरीही पारंपरिक दिसू शकता. रोज गोल्ड कॉकटेलरिंगचा ह्या हंगामातील ट्रेंड असल्याने तुम्ही स्टाईल स्टेटमेंट याचा वापर करु शकता. त्यावर नाजूक ब्रेसलेटही खुलून दिसेल.जर तुम्हाला सोन्याचे दागिने खूप आवडत असतील, तर आपण ग्लॅमरस लुकसाठी रोज गोल्ड किंवा व्हाईट गोल्डच्या दागदागिन्यांची निवड करु शकता. सध्या सोन्यातही अनेक आकर्षक पेंडंटस आणि नेकलेस पाहायला मिळतात. तसेच तुमचा बाकी ग्लॅमर लूक वाढविण्यासाठी तुम्ही रंगीत दागिन्यांचा वापर करू शकता.