हिवाळ्यात भूक जास्त लागत असल्यामुळे आपल्या आहारामध्ये लक्षणीय वाढ होते. पचनाची क्रिया हिवाळ्यात वेगाने होत असल्यामुळे भुक लागण्याचे प्रमाण वाढते. शरीरासाठी ही गोष्ट पोषक असली तरी, व्यायामाअभावी या काळात तुमचे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे थंडीत सकाळी उठून व्यायाम करण्याचा कंटाळा टाळला पाहिजे. अशावेळी तुम्हाला अगदी जिममध्ये जाण्याचा कंटाळा येत असेल, तर निदान घरच्या घरी व्यायाम नक्कीच केला पाहिजे.
अतिरिक्त उर्जेची गरज
व्यायाम करण्याचा मुख्य फायदा म्हणजे उर्जेचे प्रमाण वाढून शरीर तंदरुस्त रहायला मदत होते. याशिवाय, वेगवेगळ्या आजारांपासून संरक्षण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारी शरीराची प्रतिकारशक्तीही व्यायामाने वाढते. एकूणच शरीरात उर्जेचा योग्य संचार असला आणि कोणतीही व्याधी नसेल तर मन आनंदी राहण्यास मदत होते.
वॉर्मअप
कोणताही व्यायाम करताना वॉर्मअप करणे अत्यंत आवश्यक आहे. व्यायामापूर्वी वॉर्मअप केल्याने शरीरातील आखडलेल्या पेशी सामान्य अवस्थेत येण्यास मदत होते. व्यायामाची सुरूवात करताना हळू-हळू सुरूवात करावी. जर तुम्हाला सलग ३० मिनिटे व्यायाम करणे शक्य नसेल तर दर १० मिनिटांनी विश्रांती घ्या.
स्वत:ला सुरक्षित ठेवा
तुम्ही दिवसभरात कोणत्याही वेळी व्यायाम करत असाल तरी त्यावेळी तुम्हाला सावध राहण्याची गरज असते. व्यायामादरम्यान कोणतीही आतातायी किंवा न पेलवेल अशी कृती केल्यास तुम्हाला दुखापत होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे व्यायामाच्या ठिकाणी काही प्राथमिक गोष्टींना नक्की प्राधान्य द्या. तुम्ही जर रात्रीच्या वेळी वॉक अथवा वर्कआउट करण्यासाठी जात असाल तर, त्या भागामध्ये लाईट आहेत की नाही याची खात्री करून घ्या. व्यायाम करताना शक्यतो संगीत ऐकणे टाळावे अथवा कमी आवाजात ऐकावे. याशिवाय, गरज पडल्यास जिममध्ये वैद्यकीय उपचाराच्या प्राथमिक सोयी असतील, याची खात्री करून घ्या.
सर्दी झाल्यास
हवामानातील बदलांनुसार सर्दी, ताप यांसारखे आजार होणे सामान्य गोष्ट आहे. सुरूवातीच्या काळात थंडी सहन न झाल्यामुळे सर्दी होण्याची शक्यता असते. सर्दी झाल्यानंतर व्यायाम करणे बंद करू नका. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अथवा शरीराला सोसेल एवढा व्यायाम करा. मात्र, ताप आल्यास व्यायाम करणे टाळा. जर तुम्हाला, दम्याचा त्रास असेल तर, हिवाळ्यात अधिक काळजी घ्या. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार व्यायमाच्या आधी इन्हेलरचा वापर अवश्य करा.
जास्त कॅलरी बर्न होतात
हिवाळ्यात जसे भुक लागण्याचे प्रमाण वाढते, तसेच शरीरातील उर्जादेखील वेगाने खर्च होते. उन्हाळा किंवा पावसाळ्याच्या तुलनेत या काळात शरीरातील कॅलरीज वेगाने खर्च होतात. त्यामुळे व्यायामाच्या सुरूवातीला कॅलरीजचे प्रमाण वाढवण्यासाठी अधिक वेळ वॉर्मअप केल्याने फायदा होतो.
हिवाळ्यात शरीरामध्ये होणारे रासायनिक बदल
शरीराचे वजन योग्य राखण्यासंदर्भात जे लोक काटेकोर असतात, त्यांनी हिवाळ्यात काही गोष्टींकडे नक्कीच लक्ष दिले पाहिजे. या काळात जास्त भुक लागत असल्याने तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते. तर दुसरीकडे, शरीरातील काही अंतर्गत बदलांमुळेही वजनात वाढ होऊ शकते. एटीएलपीएल नावाचे एक रसायन आपल्या शरीरात चरबी जमा करण्याचे काम करत असते. कोलोरॅडो विद्यापीठाच्या संशोधनानुसार, हिवाळ्याच्या दिवसांमध्ये या रसायनाचा स्तर दुपटीने वाढतो. त्यामुळे या दिवसांमध्ये व्यायाम करण्याचा कालावधी वाढवा.