Mango Health Benefits : उन्हाळ्यात अनेक बाजारपेठांमध्ये आंबा, कलिंगड, टरबूज, चिकू अशी अनेक हंगामी फळं दिसून येतात. पण, या फळांमध्ये अनेक जण आंब्याची खूप वाट पाहत असतात. आंब्याला फळांचा राजा, असे म्हणतात. त्याची गोड, मधुर चव सर्वांना आवडते. काहींना आमरस आवडतं, तर काहींना आंब्याचे आइस्क्रीम. या हंगामात बाजारात आंब्यापासून तयार होणारे अनेक पदार्थ उपलब्ध होतात. लहानांपासून मोठेही हे पदार्थ आवडीने खातात. पण तुम्हाला आंबा खाण्याची योग्य वेळ कोणती माहितेय का? कारण- चुकीच्या वेळी आंबा खाल्ल्याने अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी अनेक लहान लहान गोष्टी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. त्याबाबत आयुर्वेदिक डॉक्टर मनीष यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून सविस्तर माहिती दिली आहे.

आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती?

आंबा खाण्यापूर्वी तुम्ही एक गोष्ट करायला हवी आणि ती म्हणजे बाजारातून आंबा आणल्यानंतर किंवा फ्रिजमधून आंबा बाहेर काढल्यानंतर लगेचच खाणे टाळा. आंबा नेहमी दोन तास तरी पाण्यात भिजवत ठेवा. खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवा. त्यामुळे आंब्यामध्ये असलेले थर्मोजेनिक गुणधर्म सौम्य होतात आणि कोणत्याही प्रकारच्या आरोग्य समस्या जाणवत नाहीत.

या’ वेळेत चुकूनही खाऊ नका आंबा

रात्री कोणतेही फळ खाऊ नये हे जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे. फळांमध्ये असलेल्या पोषक घटकांचा शरीरावर परिणाम तेव्हाच होतो जेव्हा ती सकाळी किंवा संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी खाल्ली जातात. संध्याकाळी ५ नंतर आंबा खाणे टाळावे. सकाळी नाश्त्यात आंबा खाण्याची चूक कधीही करू नये. जर तुम्ही पोहे किंवा दलिया खात असाल, तर तुम्ही आंबा खाऊ शकता. रिकाम्या पोटी आंबा खाऊ नका. असे केल्याने तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते .

आंबे खाण्याची योग्य वेळ कोणती?

जेवणानंतर लोकांना आंबा खायला खूप आवडते; पण रोजच्या जेवणाबरोबर आंबा खाऊ नये. आंबे खाण्याची सर्वोत्तम वेळ सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत आहे. या काळात आंबा खाल्ल्याने आरोग्यावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.