क्लोनिंगनंतर एटीएममधून पैसे चौरीला जाण्याची आणखी पद्धत सध्या चर्चेत आहे. एटीएम ‘स्कीमर’च्या साह्याने चोर बँक खात्यातून पैसे लंपास करत असल्याचे वर्धा येथे आढळून आले आहे. चोरीच्या या पद्धतीमुळे पोलिसही हवालदिल झाले आहेत. तर ग्राहक चांगलेच त्रस्त आहेत. बँकेचे एटीएम ‘स्कीमर’ उपकरणाच्या माध्यमातून उघडे करून ग्राहकांच्या खात्यातील पैसे अन्य राज्यातून लंपास करणाऱ्या टोळीने पोलीस हवालदील तर ग्राहक त्रस्त झाले आहेत.
वर्धा जिल्हय़ात डिसेंबरपासून एटीएममधील रक्कम चोरीचा हा नवाच गोरखधंदा सुरू झाला असून विविध ग्राहकांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये लंपास करण्यात आले आहेत. शहर पोलिसांकडे विनोद देवढे यांच्या खात्यातून एक लाख साठ हजार रुपये लंपास करण्यात आल्याची तक्रार २५ डिसेंबर २०१८ला दाखल झाली होती. तक्रारकर्त्यांने एटीएममधून रक्कम काढल्यावर काही तासांनी किंवा पुढील काही दिवसात त्याची रक्कम अन्य एटीएममधून काढल्या गेली.
ग्राहकाच्या खात्यातील ही रक्कम ओडिशा, बिहार व महाराष्ट्रातील काही एटीएम केंद्रातून काढल्या गेल्याचे निदर्शनास आले. अशा फसवणुकीत ‘स्कीमर’ या उपकरणाचा वापर झाल्याचे यंत्रणेच्या निदर्शनास आले. ‘स्कीमर’ हे एक छोटे यंत्र असून एटीएममध्ये कार्ड टाकण्याच्या जागेवर ते लावले जाते. एटीएमच्या स्लॉट सारखेच हे उपकरण असल्याने ते निदर्शनास येत नाही. ग्राहक अशा ‘स्कीमर’ लावलेल्या एटीएममधून व्यवहार करतात, तेव्हा त्यांच्या कार्डची संपूर्ण माहिती ‘स्कीमर’मध्ये साठवले जाते. आरोपी मग त्या माहितीपासून बनावट (क्लोन) एटीएम कार्ड तयार करून रक्कम काढून घेतात. यादृष्टीने सायबर पोलिसांनी ग्राहकांना खबरदार करताना काही सूचना केल्या.
एटीएम केंद्रात गेल्यावर कार्ड टाकण्याची जागा हलवून बघावी. स्कीमर असेल तर ते हालेल किंवा थेट हातात येईल. बोटाने पिनकोड दाबताना त्यावर दुसरा हात झाकावा. एटीएम स्व्ॉपद्वारे व्यवहार करताना अधिकृत दुकानात व आपल्या नजरेसमोरच एटीएम स्व्ॉप करावे. तसेच अशी फ सवणूक लक्षात आल्यास पोलिसांना कळवण्याचे सूचित करण्यात आले आहे.