Ganesh Chaturthi 2022: भाद्रपद महिना म्हंटल की आठवतो तो गणेशोत्सव. प्रत्येकजण या दिवसाची खूप आतुरतेने वाट पाहत असतात. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बुद्धीची देवता, विघ्नहर्ता, सुखकर्ता, १४ विद्या आणि ६४ कलेचा अधिपती असलेल्या गणेशाचे पूजन या महिन्यात केले जाते. भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाच्या मूर्तिची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आपल्याकडे आहे. तसेच हा सण संपूर्ण देशभरासह अन्य देशातही मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जाणून घेऊयात गणपती बाप्पाच्या आगमनाची यंदाची तारीख, महत्व आणि पूजेचा शुभ मुहुर्त
बाप्पाच्या आगमनाची तारीख
दरवर्षीप्रमाणे भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. या चतुर्थीला सिद्धी विनायक व्रत असेही म्हटले जाते. या दिवशी देशाच्या अनेक ठिकाणी लोक श्रीगणेशाच्या मूर्तीची पूजा करतात. या वर्षी बुधवार ३१ ऑगस्टला, भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी आहे. म्हणजेच ३१ ऑगस्टला गणपती बाप्पा सर्वत्र विराजमान होतील. बुधवारी गणेश चतुर्थी आल्याने या व्रताचे महत्त्व वाढत आहे कारण गणपती बाप्पा स्वतः बुधवारचा देव आहे.
( हे ही वाचा: Krishna Janmashtami 2022: कृष्ण जन्माष्टमी कधी आहे? पूजेचा विधी, तिथी, शुभ मुहूर्त आणि महत्त्व जाणून घ्या)
गणेश चतुर्थीचं महत्त्व
पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला आला तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि वाढ होते, असं मानलं जातं. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात
गणेश चतुर्थी शुभ मुहूर्त
गणेश चतुर्थी म्हणजेच भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ३० ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून ३४ मिनिटांनी सुरू होईल. तर भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथी ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजून २३ मिनिटांनी संपेल. यंदा गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा आपल्यासोबत शुभ रवियोग घेऊन येणार आहेत. या शुभ योगाबद्दल असे म्हटले जाते की, या योगामध्ये सर्व अशुभ योगांचे प्रभाव नष्ट करण्याची ताकद असते. म्हणजेच सर्व अडचणी, क्लेश, अडथळे दूर करून भक्तांना प्रसन्न करण्यासाठी गणरायाचे आगमन होत आहे.