होळी या सणाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. आपल्या प्रियजनांसोबत मजामस्ती आणि स्वादिष्ट पक्वान्न यांच्यामुळे लोक उत्सुकतेने दिवस मोजतात. या वर्षाबाबत बोलायचं झाल्यास १८ मार्च २०२२, शुक्रवारी रंगपंचमी साजरी केली जाईल. होलिका दहन १७ मार्चच्या रात्री केले जाईल. असे मानले जाते, भक्त प्रल्हादची भक्ती आणि भगवान विष्णू यांच्याद्वारे प्रल्हादाच्या प्राणांची केलेली रक्षा याचा आनंद व्यक्त करण्यासाठी होळी हा सण साजरा केला जातो.
होलिका दहनाची शुभ वेळ आणि पद्धत
यावर्षी होलिका दहन करण्यासाठीचा शुभ मुहूर्त १७ मार्च २०२२, गुरुवारी रात्री ९ वाजून २० मिनिटे ते १० वाजून ३१ मिनिटांपर्यंत असेल. म्हणजेच होलिका दहन करण्यासाठी फक्त १ तास १० मिनिटांचा अवधी असेल. होलिका दहन करण्यासाठी हवेशीर ठिकाणी एक जागा निश्चित करून, सुकलेली लाकडे, पालापाचोळा, गोवऱ्या यांचा ढीग करतात. मग शुभ मुहूर्तावर त्याची पूजा करून ते जाळतात. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते.
होलिका दहनामागील पौराणिक कथा
धर्म-पुराणांनुसार असुर राजा हिरण्यकश्यपू याचा पुत्र प्रल्हाद भगवान विष्णूंचा भक्त होता. असुर राजाला ही गोष्ट आवडत नसे. त्याने आपल्या मुलाला भगवान विष्णूची भक्ती करण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय केले. परंतु जेव्हा तो प्रत्येक वेळी अपयशी ठरला तेव्हा त्याची बहीण होलिकाने ही जबाबदारी स्वतःवर घेतली. होलिकाला वरदान मिळाले होते की अग्नी तिला जाळू शकत नाही. त्यामुळे प्रल्हादला मारण्यासाठी तिने त्याला आपल्या मांडीवर घेऊन आगीत प्रवेश केला. यावेळी प्रल्हाद भगवान विष्णूचे स्मरण करत राहिला. तो वाचला पण होलिका त्या आगीत जळून मरण पावली. तेव्हापासून, दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या पौर्णिमेला दुष्टांच्या अंताचे प्रतीक म्हणून होलिका दहन केले जाते.