Wooden VS Plastic Comb: केस हे स्त्री पुरुष दोघांच्या सौंदर्याचे प्रतिक मानले जाते. तुमचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलण्याचे काम डोक्यावरचे केस करतात. अनेक महिलांना तर आपले केस सगळ्यात प्रिय असतात म्हणूनच केस गळायला लागले, पांढरे झाले,कोंडा ,तेलकट टाळू यामुळे अनेक जण चिंतेत असतात. यावर उपाय मिळावा म्हणून हजारो रुपये आठवड्यात खर्च केले जातात. अलीकडेच केस विचारण्याच्या कंगव्याच्या सुद्धा वेगवेगळ्या स्टाईल्स बाजारात आल्या आहेत. लाकडी कंगवा तर सध्याचा सर्वात मोठा ट्रेंड आहे पण नुसतं ट्रेंडच्या मागे लागून उत्पादन वापरणं हे अनेकदा महागात पडू शकतं. त्यामुळे आज आपण तज्ञांकडूनच तुमच्या केसांच्या प्रकारानुसार नेमके कोणते कंगवे वापरायला हवेत हे जाणून घेणार आहोत..

त्वचा विशेषज्ञ, डॉ आंचल पंथ यांनी इंस्टाग्रामवर दिलेल्या माहितीनुसार, लाकडी कंगवा हा केसांच्या मसाजसाठी अत्यंत उपयुक्त मानला जातो. लाकूड व केस यांच्यात स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी तयार होत नसल्याने यामुळे रुक्ष केस विस्कटत नाहीत व परिणामी केस गळण्यापासूनही सुटका होऊ शकते. हे फायदे जितके खरे आहेत तितकंच हे ही महत्त्वाचं आहे की, “प्रत्येक प्रकारच्या केसावर लाकडी कंगवा योग्य ठरत नाही”.

लाकडी कंगवा कुणी वापरू नये? (Who Should Not Use Wooden Comb)

लाकडी कंगवा हा रुक्ष केसांसाठी योग्य आहे पण ज्यांचा स्कॅल्प तेलकट असेल किंवा कोंडा अधिक असेल त्यांनी हे कंगवा वापरणे टाळावे. जर डोक्याला केसांमध्ये काही जखम झाली असेल किंवा काही ऍलर्जी असेल तरी हा लाकडी कंगवा वापरणे अपायकारक ठरू शकते. लाकडाच्या कंगव्याचे टोक थोडे तीक्ष्ण असते, केसाला मसाज देण्यासाठी अशी डिझाईन केलेली असते. पण समजा केस धुतलेले नसतील किंवा प्रवासामुळे केसात धूळ- माती अडकली असेल तर या कंगव्याने तेलसह हे बॅक्टरीया सुद्धा स्कॅल्पमध्ये शिरतात. यामुळे केसाची वाढही खुंटते व गुणवत्ताही कमी होते.

लाकडी कंगवा कुणी वापरावा? (Who Should Use Wooden Comb)

कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलच्या सल्लगार व त्वचा तज्ज्ञ ट्राइकोलॉजिस्ट डॉ तृप्ति डी अग्रवाल यांनी सांगितले की, जर तुमचा स्कॅल्प रुक्ष असेल तर लाकडी कंगवा फायद्याचा ठरू शकतो. जर स्कॅल्पमध्ये खाज सुटत असेल आणि केस विस्कटलेले असतील तर केस नीट सेट होण्यासाठी लाकडी कंगवा फायदेशीर ठरू शकतो.

हे ही वाचा<< तुमच्या वयानुसार तुमचे वजन किती हवे? आजारांना दूर ठेवा, परफेक्ट बॉडीसाठी ‘हा’ सोपा तक्ता पाहा

दरम्यान, स्किन स्पेशलिस्ट सांगतात की कुरळ्या केसांसाठी लाकडी कंगवा योग्य पर्याय आहे. पण यामुळे तुमच्या केसाची गुणवत्ता बदलणार अशा दाव्यावनवर विश्वास ठेवू नका. लाकडी कंगवा प्लॅस्टिकच्या तुलनेत पर्यावरणासाठी उत्तम पर्याय आहे पण यामुळे केस तुटण्याची शक्यता कमी होईल हा चुकीचा दावा ठरू शकतो.