Which dates are best: रिकाम्या पोटी खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती आणि पचनशक्ती वाढते. हृदय निरोगी ठेवण्यासोबतच खजूर हार्मोन्सचे संतुलन राखण्यासही मदत करतात. खजुरांमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढल्याने रोगांपासून आपला बचाव होतो. खजुरांमध्ये शरीरासाठी उपयोगी असणारे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन व फायबर असते. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असले तरी त्यात फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि आवश्यक खनिजेदेखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे खजूर रिफाइंड साखरेला एक चांगला पर्याय ठरतात. मात्र, प्रश्न असा आहे की नेमके कोणते खजूर खाल्ले पाहिजेत? खजुराचेही अनेक प्रकार आहेत, त्यातले कोणते खजूर अधिक पौष्टिक आहेत ते जाणून घेऊ…
खजूर रक्तातील साखर नियंत्रित करू शकतात का?
गोडवा असूनही खजुरामध्ये कमी ते मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स (GI) असतो. मध्यम प्रमाणात खाल्ल्यास रक्तातील साखरेमध्ये अचानक वाढ होत नाही. खजुरामधले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हे घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.
ओवा खजूर : लहान, गडद व अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असलेले हे खजूर कोलेस्ट्रॉलमुक्त असतात. तसेच त्यामध्ये चरबी कमी असते आणि प्रथिने व फायबर भरपूर प्रमाणात असतात.
किमिया खजूर : मऊ व नैसर्गिकरीत्या गोड असलेले किमिया खजूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत आणि सामान्यतः ते मिल्क शेकसाठी वापरले जातात. त्यात साखरेचे प्रमाण मध्यम असले तरी त्याचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
मेडजूल खजूर : मोठे आणि चवीला कार्मेलसारखे असलेले हे खजूर सर्वांत गोड खजुरांपैकी एक आहेत आणि निरोगी आहारात ते समाविष्ट केले जाऊ शकतात. मात्र, यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने याचे कमी प्रमाणात सेवन करावे.
खद्रावी खजूर : मऊ आणि ओलसर असलेल्या या खजुरांमध्ये साखर कमी असते.
डेगलेट नूर खजूर : सौम्य गोडवा असलेली ही खजुराची जात आहे. डेगलेट नूर खजूर बहुतेकदा एनर्जी बार आणि स्नॅक्समधून खाल्ले जातात. कारण- त्यांच्यात फायबर आणि नैसर्गिक साखरेचे संतुलन असते.
खजूर किती खावेत?
जास्त साखरेचे सेवन टाळण्यासाठी एका वेळी २-३ खजूर खा.
काजू, बिया किंवा दह्यासह खजूर खाल्ल्याने साखरेचे शोषण कमी होण्यास मदत होते.
ओट्स किंवा संपूर्ण धान्यांमध्ये खजूर घातल्याने रक्तातील साखरेचे नियंत्रण चांगले होते.
प्रक्रियायुक्त खजूर टाळा : साखरेने लेपित किंवा साखरेच्या सिरपमध्ये भिजविलेल्या खजुरांपासून दूर रहा. त्याऐवजी नैसर्गिकरीत्या वाळलेले खजूर निवडा.