आजकाल प्रत्येक लहान मुलाचा मोबाईलचा वापर वाढला आहे. अनेक लहान मुलं तर मोबाईल नसेल तर जेवत सुद्धा नाहीत, त्यामुळे त्यांचा हट्ट नाईलाजाने पालकांना पूर्ण करावा लागतो. पण या वाढलेल्या स्क्रिन टाइममुळे लहान मुलांच्या दृष्टीवर वाईट परिणाम होऊन त्यांची दृष्टी कमजोर होते असल्याचे दिसत आहे. अगदी लहान वयात देखील मुलांना चष्मा वापरावा लागत आहे. मुलांच्या वाढत्या स्क्रिन टाइममुळे अनेक पालक चिंतेत असतात. यावर उपाय करण्यासाठी मुलांच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करू शकता, कोणते आहेत ते पदार्थ जाणून घ्या.
कठीण कवचाची फळे
कठीण कवचाची फळे – काजू, बदाम, शेंगदाणे ‘विटॅमिन ई’चे उत्तम स्रोत मानले जातात, त्यामुळे लहान मुलांनी याचे सेवन केल्यास त्यांची दृष्टी सुधारण्यासाठी नक्की मदत मिळू शकते. यासह कठीण कवचाची फळे ‘मायोपिया’वरील घरगुती उपचारासाठी उत्तम पर्याय मानले जाते. मायोपिया म्हणजे दूरची दृष्टी अस्पष्ट होण्याची अवस्था. काजू, बदाम, शेंगदाणे यांमध्ये ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते. ‘ओमेगा ३ फॅटी ऍसिड’मुळे डोळ्यांचा कोरडेपणा आणि डोळ्यांचे विकार कमी होण्यास मदत होते.
हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, विटॅमिन ए, सी आणि बी १२ आढळते, जे दृष्टीसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. तसेच यामुळे मुलांमध्ये वाढत्या वयानुसार होणाऱ्या मोतीबिंदू आणि मॅक्युलर डिजनरेशन हे आजार रोखण्यास मदत करते. त्यामुळे मुलांच्या आहरात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा.
मासे
माशांमध्ये देखील ओमेगा ३ फॅटी ऍसिड आढळते, जे लहान मुलांच्या रेटीनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. तसेच हे डोळ्यांचे स्नायू मजबूत करण्यास आणि मेंदूच्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते.
आणखी वाचा : रोज सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो का? ‘या’ सवयी ठरतात कारण; लगेच करा बदल
गाजर
लहान मुलांची दृष्टी सुधारण्यासाठी गाजर फायदेशीर ठरते. यामध्ये बीटा कॅरोटीन आढळते, जे डोळ्यांच्या रेटीनासाठी फायदेशीर ठरते तसेच त्यामुळे सुर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते.
स्ट्रॉबेरी आणि आंबट फळं
स्ट्रॉबेरी आणि संत्री, मोसंबी अशा आंबट फळांमध्ये ‘विटॅमिन सी’ भरपूर प्रमाणात आढळते. ‘विटॅमिन सी’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास सोबतच डोळ्यांना इन्फेक्शनपासून वाचवण्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते.
(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)