Avoid these food with curd: दही हा भारतीय घरातील एक अविभाज्य भाग आहे. बिर्याणी, पराठा असो किंवा साधा डाळ-भात असो, आपल्याला गारेगार एक वाटी दही खाण्याचा आनंद घ्यायचाच असतो. आरोग्य तज्ज्ञ आतड्यांचे आरोग्य नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज दही खाण्याचा सल्ला देतात. जगभरातील अनेक संस्कृतींमध्ये दही खाणे ही एक सामान्य पद्धत आहे, जी त्याची चव, पौष्टिकतेचे फायदे आणि आतड्यांच्या आरोग्यास समर्थन देणारे प्रो-बायोटिक गुणधर्म यांसाठी मूल्यवान आहे.

तथापि, आयुर्वेद आणि इतर काही आहार पद्धतींमध्ये दही खाताना विशिष्ट पदार्थांचे सेवन करणे टाळावे किंवा दही आणि काही पदार्थ एकत्र खाऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. आज आपण अशाच काही खाद्यपदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांच्यासोबत दही खाल्ल्याने त्याचा पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.

आंबट फळे आणि दही

अनेकांना फळांबरोबर दही खाण्याची सवय असते. पण, खरे सांगायचे झाल्यास, फळाबरोबर दह्याचे सेवन करणे आरोग्याच्या दृष्टीने धोक्याचे ठरू शकते. खासकरून, आंबट फळे जसे की संत्री, द्राक्षे किंवा लिंबू यांच्यासोबत दह्याचे सेवन केल्याने पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते आणि पचनसंस्थेत अडथळे निर्माण होऊ शकतात. आयुर्वेदानुसार दही आणि फळांमध्ये चव आणि पचनाच्या बाबतीत परस्परविरोधी गुण असतात. आंबट फळे आणि दही या दोन्ही पदार्थांचे वेगवेगळ्या पद्धतीने पचन होते आणि त्यामुळेच पोटात पचनासंबंधी असंतुलन निर्माण होऊ शकते.

बटाटे आणि दही

बटाटे आणि दहीदेखील अनेकांना एकत्र खायला आवडते. बटाटे आणि दही यांचे एकत्रितपणे सेवन केल्यास अनेकदा पोटात वेदना सुरू होतात. बटाट्यात मोठ्या प्रमाणात स्टार्च असतो आणि दह्यात लॅक्टिक अ‍ॅसिड असते. या दोन्ही पदार्थांच्या पचनाची पद्धत ही वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यांचे एकत्रित सेवन केल्यास पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

मासे आणि दही

मांसाहारप्रेमींचे आवडते खाद्य असलेल्या माशांचेही दह्याबरोबर एकत्रित सेवन करणेसुद्धा पचनसंस्थेच्या आजारांना आमंत्रण देण्यास कारणीभूत ठरू शकते. माशांमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने असतात, जी आरोग्यासाठी आवश्यक असतात. तसेच दह्यामध्ये लॅक्टिक अ‍ॅसिड असते. म्हणूनच माशांचे आणि दह्याचे एकत्रित सेवन केल्याने पचनसंस्थेचे कार्य सुरळीत चालण्यात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे पचन मंदावण्याची शक्यता असते. तसेच, पोटात गॅस अणि जडपणा जाणवू शकतो.

साखर आणि दही

अनेक भारतीय लोक साखर आणि दही खाणे शुभ मानतात. बऱ्याच जणांना तर दह्यात साखर घालून खाणे अत्यंत आवडते. परंतु, दही आणि साखर एकत्रितपणे अधिक प्रमाणात खाल्ल्याने पचनासंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात. साखर आणि दह्याचे एकत्रित सेवन पचनक्रिया मंद करू शकते. दही आणि साखरेचे सेवन अ‍ॅलर्जी किंवा सूज या त्रासांना कारणीभूत ठरू शकते.

Story img Loader