Which Pot is Better to Keep Water Cold: उन्हाळा सुरू होताच बाजारात माठ खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. पूर्वी घरोघरी असणारे माठ आता इतर पर्याय उपलब्ध झाल्याने नियमितपणे वापरण्याचं प्रमाण कमी झालं आहे; मात्र उन्हाळ्यात आवर्जून त्यांचा वापर केला जातो. माठातलं पाणी पोटासाठी अनेकदृष्या फायदेशीर ठरते. मातीच्या भांड्यात ठेवलेले पाणी नैसर्गिकरित्या थंड होते. रोज माठातलं पाणी प्यायल्याने गॅस, ॲसिडीटी यांसारख्या पचनाच्या समस्या दूर होण्यास मदत होते. बाजारात आपल्याला काळे, लाल आणि पांढऱ्या रंगाचे माठ पाहायला मिळतात. मातीचा माठ खरेदी करताना अनेकांना प्रश्न पडतो की, लाल माठ, पांढरा माठ की काळा माठ; त्यापैकी नेमका कोणता माठ खरेदी करावा, असा संभ्रम अनेकांच्या मनात निर्माण होतो. कोणत्या माठात पाणी जास्त थंडगार राहतं असे प्रश्न अनेकांना पडतात. चला तर मग काळा, लाल आणि पांढरा यांपैकी कोणता माठ चांगला ते जाणून घेऊ या.
आयुर्वेदातही मातीच्या भांड्यात पाणी पिणे, अन्न शिजवणे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले गेले आहे. माती ही सर्वात शुद्ध आणि रोग दूर करणारी आहे असे म्हणतात. उन्हाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवायचे असेल तर माठातले पाणी पिणे गरजेचे आहे. फ्रिजमधले गार पाणी पिऊन अनेक समस्या निर्माण होतात, तर माठातले पाणी तुम्हाला निरोगी ठेवते. हे पाणी प्यायल्याने आरोग्याला बरेच फायदे मिळतात.
पूर्वी काळे अस्सल मातीपासून बनवले जाणारे माठ प्रत्येकांच्या घराघरात असायचे, आता याचे स्वरूप बदलले असून गेल्या काही वर्षांपासून डिझाइन असलेले मातीचे माठ बाजारात दाखल झालेले दिसतात. विविध प्लास्टिकचे, धातूंचे तसेच वेगवेगळ्या डिझाईन्सचे माठ तुम्हाला बाजारात पाहायला मिळतील. या माठाचेदेखील आता आधुनिकीकरण झाले आहे. दिसायला आकर्षक आणि नळ तसेच झाकण असलेले हे माठ ग्राहकांचे लक्ष लगेच वेधून घेतात.
डिझाइन असलेले पांढऱ्या मातीचे माठ बाजारात दाखल झालेले दिसतात. हे माठ दिसायला आकर्षक असले तरी त्यात पाणी म्हणावे तितके गार होत नाही. या माठांनाच चिनी मातीचे माठ असेही म्हणतात. या मातीमध्ये काही प्रमाणात सिमेंट मिक्स केलेले असण्याची शक्यता असल्याने या माठात हवे तितके पाणी थंड होईलच याची शाश्वती देता येत नाही.
लाल माठ विटांच्या मातीपासून बनवला जातो, काळ्या माठापेक्षा लाल माठ थोडा जाड असतो. या माठाचेदेखील आता आधुनिकीकरण झाले आहे; तर काळा माठ काळी माती म्हणजे काळ्या खडकापासून बनवला जातो. लाल व काळ्या माठात माती असल्याने पाणी नैसर्गिकरित्या उत्तम थंड राहू शकतं. काळा हा उष्णता शोषून घेणारा रंग असल्याने काळ्या माठातील पाण्याचा गारवा अन्य दोन माठांच्या तुलनेत थोडा जास्त असू शकतो.