पांढरे शूज घालायला कितीही चांगले दिसले तरी ते स्वच्छ करणे अत्यंत कठीण असते. यावरील डाग सहजासहजी साफ होत नाहीत. अशा परिस्थितीत जर काही टिप्स फॉलो केल्या तर फक्त पाच मिनिटांत पांढरे शूज नवीनसारखे चमकू शकतात. घरच्या घरी हे शूज स्वच्छ करणे खूप सोपे आहे.
शूजनुसार करा स्वच्छ
शूज चामड्याचे असोत किंवा कॅनव्हासचे, त्यानुसार ते स्वच्छ केले पाहिजेत. पांढरे कॅनव्हास शूज स्वच्छ करणे सोपे असते. कोणतेही शूज धुण्यापूर्वी त्याची लेस काढा आणि साबणाच्या पाण्यात भिजवा. काही शूज मशीनने धुता येतात तर काही फक्त हातानेच स्वच्छ करता येतात. हे शूजच्या मटेरियलवर अवलंबून असतं.
चामड्याचे शूज असे करा स्वच्छ
पांढऱ्या चामड्याचे बूट स्वच्छ करण्यासाठी टूथब्रश, सुती कापड, इरेजर स्पंज, पेपर टॉवेल, लिक्विड डिश साबण आणि एक कप कोमट पाणी घ्या. सर्वप्रथम लेस काढा आणि टूथब्रशने शूजवर साचलेली घाण काढून टाका. आता कोमट पाण्यात डिश साबण मिसळा आणि टूथब्रशच्या मदतीने हे पाणी शूजवर पसरवा. आता चांगले घासून घ्या. त्यानंतर स्पंज पाण्यात भिजवा आणि शूजमधून साबणाचे पाणी काढा. शेवटी शूज सुती कापडाने वाळवा.
टूथपेस्टचा वापर
चामड्याचे बूट पांढऱ्या टूथपेस्टनेही स्वच्छ करता येतात. शूजवर टूथपेस्ट लावा आणि गोलाकार हालचालीत घासा. यानंतर, टूथपेस्ट शूजवर १० ते २० मिनिटे राहू द्या. आता ओल्या कापडाने शूजमधून टूथपेस्ट काढा. याशिवाय एक कप पाण्यात बेकिंग सोडा आणि दोन चमचे पांढरा व्हिनेगर मिसळा. ब्रश किंवा कापडाच्या मदतीने ते शूजवर घासून घ्या आणि नंतर स्वच्छ कापडाने शूज पुसून टाका. पांढऱ्या चामड्याचे शूज नवीनसारखे दिसतील.
लिंबू साफ करेल डाग
पांढरे कॅनव्हास शूज किंवा पांढऱ्या कापडाचे स्पोर्ट्स शूज किंवा स्नीकर्स स्वच्छ करण्यासाठी एक लिंबू घ्या, त्याचा रस काढा, तो शूजवरील डागांवर लावा आणि एक तास उन्हात राहू द्या. यानंतर शूज पाण्याने स्वच्छ करा. याशिवाय एका कपामध्ये गरम पाणी घाला आणि त्यात बेकिंग सोडा आणि डिटर्जंट मिसळा. ते बुटांवर लावा आणि घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा.