Tips To Avoid Oral Diseases : तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे हे शरीराच्या स्वच्छतेइतकेच महत्त्वाचे आहे. या गोष्टीकडे तुम्ही दुर्लक्ष केल्यास अनेक प्रकारचे तोंडाचे आजार होऊ शकतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO ) सुमारे ३.५ अब्ज लोकांना तोंडाचे आजार आहेत. अनेक अहवाल आणि अभ्यासानुसार, तोंडाचे आजार अनेक प्रकारचे असू शकतात. यामध्ये दात किडणे, तुटणे, पडणे पीरियडॉन्टल रोग आणि तोंडाचा कर्करोग यांचा समावेश होतो. पण, हे टाळता येऊ शकतात. तर हे कसे टाळायचे असा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल ना? तर जागतिक आरोग्य संघटनेने तुमचे काम सोपे केले आहे.
तर तोंडाचे आजार टाळण्यासाठी WHO ने चार सोप्पे मार्ग सांगितले आहेत…
जागतिक आरोग्य संघटनेने दररोज दात घासण्याची शिफारस केली आहे. यासाठी फ्लोराईड (fluoride) टूथपेस्ट वापरा. हे दात किडण्यापासून वाचवून त्यांना मजबूत करण्यास मदत करते.
तोंडाचे आजार टाळण्यासाठी फ्री शुगरचे सेवन कमी करा. फ्री शुगर ही अशी आहे, जी कोणत्याही खाद्यपदार्थात किंवा पेयामध्ये घातली जाते. दातांव्यतिरिक्त ते संपूर्ण शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.
तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट इत्यादी अनेक पदार्थांची विक्री होते. तोंडाचे आजार टाळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने सर्व प्रकारच्या तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्याचे आवाहन केले आहे.
अल्कोहोल यकृताचे नुकसान करते. त्याचबरोबर ते तोंडासाठीदेखील हानिकारक असते, त्यामुळे अल्कोहोलचा वापर कमी करा. शक्य असल्यास ते पूर्णपणे सोडून द्या.
तोंडाची स्वछता राखणे महत्वाचे का आहे
तोंडाची स्वच्छता एकंदर आरोग्य आणि कल्याणासाठी महत्त्वाची आहे. तोंडाच्या अस्वच्छतेमुळे पोकळी, हिरड्यांचे आजार आणि श्वासाची दुर्गंधी यासह दातांच्या विविध समस्या उद्भवू शकतात. या परिस्थितींचा केवळ आपल्या तोंडाच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही, तर त्यामुळे आपल्या एकूण शारीरिक आरोग्यावरही नकारात्मक परिणाम होऊ शकतो. उदाहरणार्थ, हिरड्यांच्या आजाराचे जीवाणू रक्तप्रवाहात जाऊ शकतात आणि शरीरात इतरत्र जळजळ निर्माण होऊ शकते; ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा आणि इतर जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण होऊ शकतो. तोंडात बॅक्टेरिया जमा होण्यापासून टाळण्यासाठी ब्रशिंग, फ्लॉसिंग आणि दंत तपासणी आवश्यक आहे.