Why is Karela so Bitter: कारले हे चवीसाठी अत्यंत कडू म्हणून प्रसिद्ध आहे. कारल्याची भाजी नाव ऐकताच काही जण नाक मुरडतात. कारण, कारले कडू असते. कारले म्हटलं तरी तोंडात कडूपणा यायला लागतो. जेव्हा आपण कारल्याची भाजी करतो तेव्हा भाजीतल्या कडूपणाची चव नकोशी वाटते. कारले खायला कडू वाटत असले तरी आरोग्यासाठी ते वरदानापेक्षा कमी नाही. याचे नियमित सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे, असं तज्ज्ञ सांगतात. पण या आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या कारल्यामध्ये इतका कडूपणा का असतो, तुम्हाला माहितीये का, चला तर जाणून घेऊया यामागचे नेमके कारण काय आहे…

कारले अनेक पोषकतत्व आणि खनिजांनी समृद्ध असतात आणि ते निरोगी मानले जाते. कारल्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, फायबर आणि लोह असे अनेक पोषक घटक असतात. आपल्या आहारात कारल्याचा समावेश केल्यास माणूस अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. कारले ही आरोग्यदायी भाजी आहे जी अनेक रोगांवर उपयुक्त आहे.

(हे ही वाचा: गुलाब जामुनमध्ये ‘गुलाब’ नाही, ‘जामुन’चाही पत्ता नाही, मग असं नाव का पडलं? इंग्रजीत याला काय म्हणतात?)

कारले मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात. कारले वेगवेगळ्या रंगात आणि आकारात येतात. भारतीय कारले ४-इंच लांब असतात, तर चीनमध्ये ते ८-इंच लांब असतात. त्याचा आकार आणि लांबीही ऋतुमानानुसार बदलते. ते बाहेरून हिरवे आणि आतून पांढरे असते. त्याचा हिरव्या रंगाचा भाग सालीसारखा काढला जातो; कारण हा भाग सर्वात कडू असतो. कारल्याचा कडूपणा आरोग्यासाठी सर्वात फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. म्हणूनच, आयुर्वेदानुसार, कारल्याचा रस रोज पिणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानला जातो.

आरोग्यासाठी गुणकारी कारले कडू का असते?

आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे, भारतात इतक्‍या प्रमाणात खाल्‍ल्या जाणारे कारले भारतात प्रथम आढळले नाही. खरं तर, ते पहिल्यांदा आफ्रिकेत शोधले गेले आणि तेथून ते आशियामध्ये आले असल्याची माहिती आहे. आफ्रिकेतील उन्हाळी हंगामात हे कुंग शिकारींचे मुख्य खाद्य होते. हे त्यांच्या भागात पहिल्यांदा दिसले. कालांतराने लोकांना त्याचे फायदे समजू लागले आणि ते आशियामध्येही मोठ्या प्रमाणात खायला लागले.

कारल्यामध्ये ‘ग्लायकोसाइड मोमोर्टिसिन’ नावाचे एक गैर-विषारी घटक असते, जे कारल्याच्या कडू चवीचे खरं कारण आहे. पण या कडू चवीच्या घटकाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे विशेषतः पोटासाठी खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. पचन नीट होण्यासाठी मदत करते. तसेच गॅस इत्यादी तात्पुरत्या समस्यांपासून आराम मिळतो. आता भारत, चीन, दक्षिण आशिया खंडातील देशांमध्ये प्रामुख्याने कारल्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात आहे.