The Ideal Dinner Time: आपल्यापैकी अनेक जणांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते. अनेक लोक कामाला खूप प्राधान्य देतात आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे अनेकदा जेवणाच्या वेळाही पाळल्या जात नाहीत. आरोग्यतज्ज्ञ सांगतात की, उशिरा रात्रीचे जेवण – विशेषत: रात्री ९ नंतर – एकूणच आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. अस्वस्थ झोपेपासून ते वजन वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढणे यांसारखे परिणाम होऊ शकतात. कधीतरी रात्रीच्या उशिरा जेवणाचे गंभीर परिणाम होत नसले तरी रात्री ९ नंतर सतत खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

रात्री उशिरा जेवण केल्यास आरोग्यावर काय परिणाम होतात?

१. अस्वस्थ झोप – रात्री उशिरा खाल्ल्याने झोपेच्या गुणवत्तेवर लक्षणीय परिणाम होतो. अभ्यासात असे दिसून आले आहे की, जे लोक उशिरा जेवतात त्यांचं झोपेचं चक्र विस्कळीत होते. शिवाय, रात्री उशिरा जेवण केल्याने पचनास त्रास होऊ शकतो.

२. वजन वाढते

उशिरा जेवण केल्यानं वजनही वाढतं, तसेच ते हदयाच्या आरोग्यावर परिणाम करते. पोषणतज्ज्ञ डॉ. रुपाली दत्ता वजन नियंत्रणात ठेण्यासाठी जेवणाच्या वेळेची भूमिका अधोरेखित करतात. “रात्रीचे जेवण लवकर केल्यास पचनासाठी चांगले असते आणि ते वजन कमी करण्यास मदत करते. आपण जितके उशिरा जेवतो तितके अन्न आतड्यांमध्ये राहण्याची शक्यता जास्त असते, ज्यामुळे पचनावर परिणाम होतो. जर तुम्ही रात्रीचे जेवण लवकर केले तर तुमची पचनक्रिया व्यवस्थित होईल. रात्रीच्या वेळी चयापचय मंद होत असल्याने, रात्री उशिरा जेवणाचे चरबीमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते, ज्यामुळे कालांतराने वजन वाढते.

३. खराब पचन आणि गॅस

रात्री उशिरा खाणे आणि लगेच झोपणे योग्य नाही, त्यामुळे जेवण केल्यानंतर थोडा वेळ चालले पाहिजे. जेवण करून लगेच झोपल्यामुळे अपचनासारख्या समस्या उद्भवू शकतात. जेव्हा जेवण योग्यरित्या केले जाते, तेव्हा शरीर चांगल्या प्रकारे कार्य करते.

४. हृदयविकाराचा उच्च धोका

जेवणाची वेळ हृदयाच्या आरोग्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. पोषणतज्ज्ञ मेहर राजपूत सांगतात की, रात्रीचे जेवण विशेषतः मधुमेह, थायरॉईड विकार, PCOD आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोग असलेल्या व्यक्तींसाठी हानिकारक असू शकते. भारतीयांच्या जेवणात अनेकदा मिठाचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे रात्री उशिरा जेवल्यानं उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.”

रात्रीच्या जेवणाची योग्य वेळ काय?

आरोग्यतज्ज्ञांनी असे सुचवले आहे की, रात्रीच्या जेवणाची सर्वोत्तम वेळ संध्याकाळी ६ ते रात्री ८ दरम्यान आहे, ज्यामुळे शरीराला झोपण्यापूर्वी अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळतो. हे चांगले चयापचय आरोग्य राखण्यास, पचन सुधारण्यास आणि दीर्घकालीन आरोग्य गुंतागुंत होण्याचा धोका कमी करण्यास मदत करते. लवकर जेवण केल्याने एकंदर आरोग्य सुधारू शकते आणि निरोगी जीवनशैली राखण्यात मदत होते.

Story img Loader