भारतामध्ये हेपेटायटीस बीचे प्रमाण मध्यवर्ती ते उच्च आहे आणि तीव्र एचबीव्ही संक्रमित रुग्णांची संख्या अंदाजे ४० कोटी आहे. ही संख्या जागतिक भाराच्या अंदाजे ११ टक्के आहे. भारतात तीव्र एचबीव्ही संसर्गाचे प्रमाण सुमारे ३ ते ४ टक्के आहे. याव्यतिरिक्त, इंडस हेल्थ प्लस प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणीतील आकडेवारीनुसार, असे आढळून आले की १% लोक एचबीएसएजी चाचणीमध्ये बाधित आढळले आहेत. ही चाचणी हेपेटायटीस बी विषाणूसाठी प्रतिजन चाचणी आहे. नियमित तपासणी चाचण्यांदरम्यान ही माहिती गोळा करण्यात आली.
यकृत एंझाइम्स आणि यकृताच्या योग्य कार्यास मदत करणार्या प्रथिनांच्या आकडेवारीवरून असे दिसून आले की २% स्त्रिया आणि ९% पुरुष असामान्य श्रेणीत होते. बिलीरुबिनचे प्रमाण मोजणाऱ्या दुसऱ्या यकृत कार्य चाचणीत १% स्त्रियांमध्ये आणि ६% पुरुषांमध्ये असामान्य पातळी दिसून आली. बिलीरुबिन हे कावीळचे सूचक असलेले रक्तातील एक पिवळसर रंगद्रव्य असते. या अभ्यासासाठी ६ हजार ५०० नमुने तपासण्यात आले.
हेपेटायटीसची कारणे काय आहेत ?
- अल्कोहोल आणि इतर विषारी पदार्थ :
मद्यपानाचा अतिरेक यकृताला सूज आणून हानी पोहोचवू शकतो. अल्कोहोलमुळे यकृताच्या पेशींना हानी पोहोचते. यामुळे यकृताच्या ऊती घट्ट होतात किंवा त्यावर डाग पडतात (सिरॉसिस) आणि असे झाल्यास यकृत निकामी होऊ शकते.
- दाहक प्रतिक्रिया :
काहीवेळा, रोगप्रतिकारक यंत्रणा यकृतावर हल्ला करते कारण ती त्याला धोकादायक मानते. यामुळे सतत किरकोळ ते गंभीर स्वरूपाची जळजळ होते आणि वारंवार यकृताचे कार्य बिघडते. पुरुषांपेक्षा स्त्रियांना याचा अनुभव येण्याची शक्यता तिप्पट असते.
- जीवनशैलीचे घटक :
जास्त मद्यपान करणे, आरोग्यासाठी हानिकारक जीवनशैली राखणे आणि चरबी वाढवणाऱ्या पदार्थांचे जास्त सेवन करणे हे सर्व फॅटी लिव्हरला कारणीभूत ठरू शकते. ही अशी स्थिती असते ज्यामध्ये यकृतामध्ये खूप चरबी जमा होते आणि यकृताच्या पेशींची नैसर्गिक रचना विस्कळीत होते.
काही प्रतिबंधात्मक उपाययोजना :
- नियमित चाचणी :
यकृताचा कर्करोग आणि यकृताचे इतर गंभीर आजार त्वरित व्हायरल हेपेटायटीस चाचणी आणि उपचाराने टाळता येतात. यामुळे समस्यांबद्दल जाणून घेण्यास आणि चांगले आरोग्य राखण्यास मदत होते.
- आरोग्यदायी जीवनशैली :
यकृताच्या समस्या रोखण्यासाठी जीवनशैलीतील बदल, वेळेत निदान आणि त्वरित वैद्यकीय सल्ला यामुळे मदत होऊ शकते.
- स्वच्छतेच्या सवयी :
HAV विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी चांगली वैयक्तिक स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतागृह वापरल्यानंतर, डायपर बदलल्यानंतर आणि अन्न तयार केल्यानंतर, वाढल्यानंतर किंवा खाल्ल्यानंतर, आपले हात साबणाने आणि पाण्याने धुआ.
- लसीकरण करा :
हेपेटायटीस ए विरूद्ध लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. संक्रमणाचा उच्च धोका असलेल्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांसाठी हा चांगला पर्याय आहे. तथापि, हेपेटायटीस लसीकरण केवळ मुलांसाठी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी नाही. तुम्हाला धोका आहे असे वाटत असल्यास तुम्ही तुमच्या डॉक्टरांना लसीकरणाबाबत विचारावे.
आपले यकृत हा शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे आणि एकंदर चांगले आरोग्य राखण्यासाठी आपल्याला निरोगी यकृताची आवश्यकता आहे. यकृतावरील कोणताही ताण यकृताची कार्ये बिघडवू शकतो. यकृत कार्य स्थितीचे मूल्यांकन अनेक चाचण्यांद्वारे केले जाऊ शकते ज्यामध्ये सीरम बिलीरुबिन पातळी, SGPT सारखे यकृत एंजाइम, एकूण प्रथिने पातळी इत्यादी मोजले जाते. अल्ट्रासाऊंड, सीटीस्कॅन आणि एमआरआय सारख्या रेडिओलॉजिकल चाचण्या यकृताच्या संरचनेचा अंदाज घेऊ शकतात.
– अमोल नायकवडी. प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा तज्ज्ञ, इंडस हेल्थ प्लस.