दोन वर्षांपासून जगभरात कोरोना व्हायरसचं संकट घोंघावत असताना अनेक फार्मासिस्ट दुकानदारांनी त्यांची दुकानं अहोरात्र खुली ठेवली आहेत. कुणी संसर्गाची भीती पाहता अनेकांना घरपोच औषधं पुरवली आहेत. तर अनेक फार्मासिस्ट कंपन्या आता औषधं जास्तीत जास्त आणि स्वस्त दरात उपलब्ध करून देत आहेत. २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मासिस्ट दिन का साजरा केला जातो? जागतिक फार्मासिस्ट दिवसाचा इतिहास आणि थीम काय आहे जाणून घेऊयात.
इतिहास
जगभरामध्ये जागतिक फार्मासिस्ट दिन हा दिवस २५ सप्टेंबर दिवशी साजरा केला जातो. दरम्यान इस्तंबूल तुर्की येथे इंटरनॅशनल फार्मास्युटिकल फेडरेशन (FIP) कॉंग्रेसने २००९ मध्ये २५ सप्टेंबरला वार्षिक जागतिक फार्मासिस्ट दिन (WPD) म्हणून नियुक्त केले. देशाच्या कानाकोपऱ्यात आरोग्य सुधारण्यासाठी फार्मासिस्टच्या भूमिकेला प्रोत्साहन आणि समर्थन देणारे उपक्रम आयोजित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
यावर्षीची थीम
दरवर्षी फार्मासिस्टची आरोग्यावर सकारात्मक भूमिका दाखवण्यासाठी एक नवीन थीम तयार केली जाते. तसेच जागतिक फार्मासिस्ट दिन २०२१ ची थीम “फार्मसी: नेहमी आपल्या आरोग्यासाठी विश्वसनीय” आहे. थीमचा हेतू आहे की फार्मासिस्ट्स कसे योगदान देतात, जेथे प्रत्येकाला सुरक्षित, प्रभावी, दर्जेदार आणि परवडणारी औषधे आणि आरोग्य तंत्रज्ञान तसेच फार्मास्युटिकल केअर सेवांच्या प्रवेशापासून फायदा होतो.जागतिक फार्मासिस्ट डे च्या निमित्ताने अहोरात्र आरोग्य यंत्रणेमध्ये रूग्णांना औषधांचा पुरवठा करणार्या फार्मासिस्ट व्यक्तींच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
औषध विक्री हा फार्मसी क्षेत्रातील फार्मासिस्टच्या कामाचा मुख्य गाभा. रुग्णांना सुरक्षित, योग्य औषधे पुरवणे हे फार्मासिस्टचे मुख्य काम. पण आपण जागतिक स्तरावर पाहिले तर ग्लोबल फार्मासिस्टची भूमिका प्रचंड विस्तारित, विकसित झाली आहे. फार्मासिस्ट हा पेशंट आणि डॉक्टर यांच्यातील मुख्य दुवा समजला जातो. डॉक्टर ‘आरोग्यतज्ज्ञ’ तर फार्मासिस्ट हा ‘औषधीतज्ज्ञ’ समजला जातो.