तुम्ही नखं वाढवण्याचा खूप प्रयत्न करत असाल पण सतत नखं तुटतायत? नखांवर पांढऱ्या उभ्या रेषा दिसतायत? नखांचा रंग अचानक बदलतो? सहसा हे कोणतेच बदल कोणी लक्षात आणून न देता आपण पाहणार नाही. पण असं करणं तुमच्या आरोग्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं. तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या नखांच्या रंगापासून ते मजबूततेपर्यंत सर्वकाही हे तुमच्या एकंदरीत आरोग्याविषयी संकेत देत असतं. शरीरात जाणवणारी कॅल्शियम कमी ते थायरॉईड सारख्या मोठ्या आजारांची चिन्ह तुमच्या नखांवर दिसतात. ती कशी ओळखायची हे आज आपण जाणून घेणार आहोत.
वेबएमडीच्या बातमीनुसार, जर तुम्हाला नखांमध्ये बदल दिसला तर तुम्ही सावध व्हा कारण नखांचा रंग बदलणे किंवा विनाकारण नखं वारंवार तुटणे हे खराब आरोग्याचे लक्षण आहे. नखांमधील नेमके कोणते बदल लक्षात घ्यायला हवेत पाहुयात..
१) नख तुटणे
साधारण काम करत असताना किंवा कशात अडकून नख तुटत असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, पण समजा जर नुसत्या बोटाच्या स्पर्शाने तुमचं नख हलवता येऊ लागलं तर मात्र धोका आहे. जर तुमच्या नखाचा वरील भाग हा पांढरा नसून किंचित पारदर्शक असेल तर तुमच्या शरीरात कॅल्शियम कमी आहे हे समजून जा. नखं तुटणे हे थायरॉईडचे सुद्धा लक्षण असते.
२) उभ्या रेषा
नखांवर उभ्या रेषा असणे हे अत्यंत सामान्य आहे. जसे तुमचे वय वाढत जाईल त्यानुसार या रेषा आणखी स्पष्ट दिसू लागतील. यामुळे थेट कोणता धोका नसला तरी तुम्ही वयानुसार आरोग्याची काळजी घ्यावे हा संकेत मात्र निश्चितच आहे.
(Hand Reading: हाताच्या तळव्यावरील ‘हे’ तीळ देतात शुभ-अशुभ संकेत; करंगळीचा तीळ धनवान तर अंगठ्यावर..)
३) आडव्या रेषा
नखांवर आडव्या रेषा असल्यास शक्यतो अशा व्यक्तींची नखं पटापट वाढत नाहीत अशी अवस्था ही मात्र गंभीर आजारांचे लक्षण असते. २०१८ मधील एका
संशोधनानुसार, नखांवर अतिस्पष्ट आडव्या रेषा मूत्रपिंडाच्या विकाराची चिन्हे असतात.
४) पांढरे डाग
नखांवर पांढरे डाग हे शक्यतो कॅल्शियमची कमतरता दर्शवतात. मात्र याशिवाय तुमच्या शरीरात रक्त तयार करणाऱ्या हिमोग्लोबीनची मात्रा सुद्धा कमी आहे यातून समजते. नखांवर वारंवार येणारे हे डाग त्वचेचे विकार व केसगळतीच्या समस्यांचे लक्षण असते.
५) काळया लांब रेषा
नखांवर उभ्या लांब रेषा असणे हे काही अपायकारक नसले तरी या रेषांचा रंग कोणता आहे हे नक्की तपासून पहा. नखांवरील रेषा जर गडद काळ्या रंगाच्या होत असतील तर हे हृदयाशी संबंधित विकारांचे लक्षण आहे.
याशिवाय महत्त्वाची बाब म्हणजे नखांचा रंग पांढरा असावा अशी अनेकांची इच्छा असते मात्र संपूर्ण पांढरा रंग हा त्वचेतील रक्ताची कमी दर्शवतो. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या बोटाने नखावर हलका दाब द्याल तेव्हा त्यात हलका लाल रक्ताचा रंग सुद्धा दिसायला हवा.
(टीप- सदर लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे, यास वैद्यकीय सल्ला समजू नये)