Why feeling sleepy after lunch : तुम्ही दुपारी पोट भरून अतिशय स्वादिष्ट असं जेवण करता आणि त्यानंतर तुम्हाला खूप गाढ झोप येते, तर असे तुम्ही एकटे नाहीत, असे अनेकांबरोबर घडते. विशेषत: कामाच्या ठिकाणी जेवण केल्यानंतर झोप येत असेल तर काम करणे अवघड होते. अनेकदा दुपारी जेवण केल्यानंतर इतकी झोप येते की डोळे उघडणे कठीण जाते आणि आपल्याला सुस्ती येते. पण, तुम्हाला माहिती आहे का असं का होतं? दुपारच्या जेवणानंतर झोप का येते? आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.

दुपारच्या जेवणानंतर झोप का येते? (why people sleep after lunch)

जेव्हा तुम्ही शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाता, तेव्हा तुमच्या शरीरात इन्सुलिनची पातळी वाढते. तुम्ही जे काही खाता त्यासाठी तुमचे स्वादुपिंड रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलिन तयार करतात.
इन्सुलिनचे प्रमाण वाढल्याने तुमचे शरीर झोपेचा हार्मोन तयार करतात आणि हा हार्मोन तुमच्या मेंदूपर्यंत जातो, जिथे तो सेरोटोनिन आणि मेलाटोनिनमध्ये रुपांतरीत होतो. मेलाटोनिन हा एक हार्मोन आहे, जो झोपेच्या चक्राचे नियमन करतो, असे न्युट्रिशन व फिटनेस एक्सपर्ट ल्यूक कौटिन्हो (Luke Coutinho) सांगतात.

ल्यूक पुढे सांगतात, “जेव्हा तुम्ही जास्त खाता, तेव्हा तुमची पचनसंस्था तुमच्या शरीराच्या ६०-७५ टक्के ऊर्जेचा वापर अन्न पचवण्यासाठी करते, यामुळे तुमच्या शरीराच्या इतर भागांमधून ही ऊर्जा पचनसंस्थेकडे वळवली जाते,” यामुळे तुम्हाला झोप येते. विशेष म्हणजे फक्त अतिकार्बयुक्त पदार्थांच्या सेवनाने तुम्हाला झोप येत नाही, तर त्याबरोबरच अतिप्रोटिनयुक्त पदार्थांच्या सेवनानेसुद्धा झोप येते.

दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ नये म्हणून काय करावे? (How to Avoid slump)

अतिप्रमाणात खाणे, फॅटयुक्त पदार्थांचे सेवन करणे, यामुळे शरीराला त्रास होतो. तुम्ही जितके जास्त जेवण कराल, तुमचे शरीर हे जेवण पचवण्यासाठी तितकी ऊर्जा खर्च करेल. म्हणून अति जेवणाची सवय चांगली नाही. कमी जेवण करा, जेणेकरून तुम्हाला झोप येणार नाही.

जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल किंवा आळस येत असेल तर डॉक्टरांशी संपर्क साधा.