महिन्याला सहा आकडी पगार, आवडत्या व्यक्तीशी लग्न, घर-गाडी अशी प्रत्येक गोष्ट जवळ असणाऱ्या ‘मिलेनिअल’ म्हणजे आजच्या काळातल्या नव्या पिढीला स्वत:चं लग्न टिकवण्यासाठी मात्र ‘मॅरेज कोच’चा आधार घ्यावा लागतोय. आपल्या आवडत्या प्रियकर-प्रेयसीशी लग्न होऊनही दररोजच्या ताणतणावात आणि धावपळीत जोडीदारासोबत ‘नांदा सौख्य भरे’ हे वाक्य त्यांच्यासाठी स्वप्नवत ठरलं आहे. याची अनेक कारणं आहेत, पण त्यातलं सर्वात महत्वाचं आहे, जोडीदारासोबत वेळच व्यतीत न करणं.

लग्नानंतरच्या कुरबुरींना ‘भांड्याला भांडं लागणारच’ असं म्हणण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. आताची नवीन पिढी जुन्या पिढीइतकी एकमेकांशी जुळवून घेणारी नाही. त्यामुळे पारंपरिक ‘मॅरेज काऊन्सिलिंग’ हे या पिढीसाठी पुरेसं ठरताना दिसत नाहीए. या पिढीला गरज आहे ती, मॅरेज कोचची. क्रिकेट खेळाडूला ज्याप्रमाणे प्रशिक्षक प्रत्यक्ष सूचना देऊन खेळाविषयी मार्गदर्शन करतो, अगदी त्याचप्रमाणे नवरा-बायकोलाही लग्नविषयक प्रशिक्षणाची गरज असल्याचं मत ‘मॅरेज कोच’ लीना परांजपे यांनी मांडलं. गेल्या तीन वर्षांत लीना परांजपे यांनी १८० हून अधिक जोडप्यांना ‘मॅरेज कोचिंग’ दिलं आहे.

पारंपरिक ‘मॅरेज काऊन्सिलिंग’च्या तुलनेत ‘मॅरेज कोचिंग’ खूपच फोकस्ड असते. ‘मॅरेज कोचिंग’ आणि ‘मॅरेज काऊन्सिलिंग’ यांमधील फरक स्पष्ट करताना लीना परांजपे यांनी सांगितलं की, ‘भूतकाळापासून मुक्त व्हा’, ‘तुमच्या भावनांवर चर्चा करा’ किंवा ‘या रिकाम्या खुर्चीशी गप्पा मारा’ यांसारखे काऊन्सिलिंगमधले प्रकार जोडप्यांना अनकम्फर्टेबल वाटतात आणि त्यातून काहीच साध्य होत नाही. समुपदेशनासारखी दीर्घकालीन आणि भावनिक ताण निर्माण करणारी उपचारपद्धती जोडप्यांना आवश्यक नसते. त्यांना फक्त गरज असते ती एका ‘कुशल सहकाऱ्या’ची जो बुद्धीला पटेल अशी एक योजना आखेल, त्यांना काही कौशल्यं शिकवेल आणि योजना-कौशल्यं कृतीत उतरवण्यासाठी त्यांना जबाबदार धरेल.

परदेशांतील, विशेषत युरोपातील जोडप्यांमध्ये मॅरेज कोचची उपयुक्तता सिद्ध झालेली असली, तरी भारतात ‘लग्न टिकवण्यासाठी’ अद्याप त्याचं महत्व पुरेसं माहीत नाही. “प्रत्येक लग्न किंवा प्रत्येक जोडपं हे विशेष असतं आणि प्रत्येकाची एक स्वतंत्र लग्नाची गोष्ट असते, त्यामुळे आम्ही प्रत्येक जोडप्यासाठी ठराविक अशी एकच पद्धती किंवा कार्यक्रम वापरत नाही. तरीही सर्वसाधारणपणे, मॅरेज कोचिंगमध्ये ध्येयनिश्चिती, अडथळे ओळखणं, उत्तरदायित्व निश्चित करणं, विजय साजरा करणं असे चार महत्वाचे भाग असतात. प्रत्येक जोडप्याच्या गरजेनुसार, या चार भागांना कमी-जास्त महत्व दिलं जातं”, अशी माहिती मॅरेज कोच लीना परांजपे यांनी दिली.

मॅरेज काऊन्सिलिंगचं काम पॅसिव्ह आहे, तर मॅरेज कोचिंगचं काम एक्टिव्ह आहे. ज्याप्रमाणे क्रिकेट टीमचे प्रशिक्षक खेळाडूंसोबत राहून त्यांच्याकडून नियमित सराव करवून घेतात, त्याप्रमाणे मॅरेज कोचसुद्धा आवश्यकता भासल्यास जोडप्यांसोबत प्रत्यक्ष राहून त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी त्यांना थेट सूचना देतात, असंही लीना परांजपे यांनी सांगितलं.