Winter Healthy Snacks: मुंबई, पुणे व लगतच्या भागांमध्ये मागील दोन दिवसांपासून हळूहळू तापमानाचा पारा कमी होताना दिसत आहे. सकाळच्या वेळी तर छान गारवा सुद्धा अनुभवायला मिळतोय. ऑक्टोबर हिटचा तडाखा आता कमी होत असताना थंडीसाठी शरीराला तयार करण्याची वेळ आली आहे. आपल्या आजी, आई व अनेक थोरामोठ्यांनी सांगितल्याप्रमाणे हिवाळ्यात स्निग्ध पदार्थाच्या सेवनाला विशेष महत्त्व आहे. असं म्हणतात की थंडीत भूकही जास्त लागते कारण शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी लागणारी उष्णता कमी होत असल्याने शरीराला अधिक कॅलरीज बर्न कराव्या लागतात परिणामी भूक वाढू शकते अशा वेळी बाहेरचे पदार्थ खाण्यापेक्षा आपणही आपल्या बॅगेत एक खाऊ डब्बा ठेवायला हवा होता. हा डब्बा भरण्यासाठी कष्ट घ्यायचे नसतील तर त्यामध्ये फक्त भाजलेले चणे व गूळ घेऊन जाऊ शकता. काय खायचं हे ठरलं तर आता त्याचे फायदे काय हे सुद्धा जाणून घेऊया.
चणे व गूळ एकत्र खाण्याचे फायदे
१) चणे व गूळ हा शरीराला लोह पुरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. ज्यांच्या रक्तात लोहाची कमतरता आहे त्यांनी याचे सेवन आवर्जून करावे.जर तुमच्या शरीरात रक्ताची कमी असेल तर ऍनिमिया सारख्या आजारांचा धोका टाळण्यासाठी चणे व गूळ फायदेशीर ठरू शकते.
२) पचनाच्या समस्या असणाऱ्यांना सुद्धा चण्यामुळे फायबर मिळते परिणामी पचनप्रक्रियेचा वेग वाढण्यास मदत होते. शिवाय याच फायबरमुळे खाण्याची लालसा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होते व पोट भरल्यासारखे वाटते.
३) गुळ आणि चणे यांच्यामध्ये व्हिटॅमिन बी ६ चं पुरेपूर प्रमाण असतं. या दोन्ही घटकांमुळे स्मरणशक्ती बळकट होते. तसंच मेंदूची कार्य करण्याची क्षमतादेखील वाढते.
४) मूड नियंत्रित करणारे हार्मोन्स सेरोटोनिन आणि नॉरपेनाफ्रिन वाढवण्यास मदत होते. त्यामुळे शरीरावर आणि मनावर येणारा ताण कमी होतो. परिणामी, मूड खराब असल्यास गुळ -चणे खावेत.
५) गूळ व चणे एकत्र खाल्ल्याने शरीराला मुबलक प्रमाणात कॅल्शियम पुरवू शकतात. त्यामुळे थंडीत हाडांना मजबुती देण्यासाठी हे उत्तम साधन आहे.
हे ही वाचा<< २४ वर्षीय तरुणाचा शॉवर्मा खाल्ल्याने मृत्यू! शॉवर्मा विषारी कशामुळे होतो व तुम्ही कोणती काळजी घ्यावी?
काही जण डाएट किंवा फिटनेस फॅडच्या नावाखाली तूप, गूळ असे पदार्थ वर्ज्य करतात पण उलट या पदार्थांमुळे विशेषतः हिवाळ्यात फायदा होऊ शकतो हे विसरता कामा नये. फक्त एक टीप लक्षात घ्या की चणे खाताना ते निदान भाजून घ्या अन्यथा यामुळे पित्त किंवा अपचनाचा त्रास होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. गरज लागल्यास वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या)