घसा खवखवणे किंवा हिरड्यांमधून रक्तस्त्राव होत असेल तर अनेकदा आपलयाला मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचा सल्ला दिला जातो. हा सोपा आणि जुना घरगुती उपाय आहे. मुख्य म्हणजे या उपायाचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. काही संशोधनात असे आढळते की, मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुम्हाला अनेक आरोग्य समस्यांवर उपचार करण्यास मदत मिळते. जाणून घेऊ मिठाच्या पाण्याने गुळण्या करण्याचे आश्चर्यकारक फायदे…
१) पीएच लेव्हल राखता येते.
रोज मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तोंडात तयार होणारे जंतू नष्ट करण्यास मदत होते. यामुळे निरोगी पीएच लेव्हल राखण्यास मदत करते.
२) कफच्या समस्येपासून आराम
मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने तुमच्या छातीत जमा झालेला कफ सहज निघून जातो. यामुळे छातीत जाणवणारा जडपणा, जळजळ कमी होते आणि घशातील वेदना कमी होतात. त्याशिवाय तोंडातील जीवाणू आणि विषाणूंना बाहेर काढले जातात.
सर्दी, घशात खवखवणे या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतील ‘हे’ घरगुती उपाय
३) श्वसनमार्गाचे संक्रमण दूर होते
जपानमध्ये झालेल्या एका अभ्यासानुसार, दिवसातून तीन वेळा कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने अप्पर रेस्पीरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होण्याचा धोका ४० टक्क्यांनी कमी होतो.
४) टॉन्सिलिटिसपासून आराम मिळतो
टॉन्सल हे घशाच्या मागच्या बाजूला असलेला एक भाग आहे, ज्याला बॅक्टेरिया आणि व्हायरल इन्फेक्शनमुळे सूज येते. सूजलेल्या टॉन्सिलिटिसमुळे अन्न गिळताना वेदना होऊ शकते. मिठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने या वेदना कमी होण्यास मदत होते आणि ही लक्षणे कमी होतात.
५) श्वासाच्या दुर्गंधीपासून सुटका होते
जर तुम्ही तुमच्या श्वासाच्या दुर्गंधीबद्दल जागरूक असाल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करणे हा एक प्रभावी मार्ग असू शकतो. हे तोंडातील बॅक्टेरिया बाहेर टाकू शकते, ज्यामुळे श्वासाची दुर्गंधी कमी होते. यामुळे खूप कमी खर्चात तोंडाच्या दुर्गंधीपासून आराम मिळतो.
६) हिरड्यातून रक्तस्त्राव आणि दातदुखी
मिठाच्या पाण्याने रोज गुळण्या केल्यास दातदुखी आणि सुजलेल्या हिरड्यांपासून देखील आराम मिळतो. मिठाच्या पाण्याने तोंड स्वच्छ धुवल्याने दातांमधील जळजळ कमी होण्यास आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत होते. या खारट पाण्यामुळे दातात जंत राहत नाहीत, यामुळे दातदुखी दूर होण्यास मदत होते.
७) अल्सरपासून सुटका
अल्सरमुळे तोंडात असह्य वेदना होतात. यामुळे अन्न खाणे देखील कठीण होऊ शकते. पण मिठाचे पाणी या वेदना कमी करण्यास आणि अल्सर बरे होण्याची प्रक्रिया वाढविण्यास मदत करते.
मिठाच्या पाण्याने गुळण्या कशा कराव्या?
१) एक कप कोमट पाण्यात अर्धा चमचा टेबल मीठ घाला. ते पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
२) आता या पाण्याचा एक मोठा घोट घ्या आणि तोंडात धरा.
३) आता ३० सेकंद आपल्या मिठाच्या पाण्याने तोंडात चांगल्या गुळण्या करा आणि नंतर थुंकून टाका.
४) रोज सकाळी असे केल्यास तुम्हाला तोंडाच्या अनेक समस्यांपासून दूर राहता येईल.