पाणीपुरी, वडापाव, सामोसा, गरम आणि ताज्या जिलब्या इत्यादी पदार्थ आपण उभ्याउभ्या अगदी चवीने आणि मजेने खात असतो. मात्र, असे करत असताना आपण दोन गोष्टींकडे साफ दुर्लक्ष करत असतो. त्या म्हणजे, दुकानाच्या आजूबाजूची घाण, अस्वच्छता आणि पदार्थांवर बसलेल्या किंवा घोंगावणाऱ्या माश्या. अनेक दुकानांमध्ये, ठेल्यांवर किंवा अगदी आपल्या घरातील पदार्थांसुद्धा माश्या बसलेल्या असतात. त्यांना आपण खाण्याआधी नुसतं हाताने उडवून लावतो आणि पदार्थ खातो.
मात्र, असे पदार्थ खाल्ल्याने आपल्याला ताप, पोटदुखी, पोट खराब होणे, घश्याला त्रास होण्यासारखे कितीतरी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा उघड्यावरच्या गोष्टी खाणे आपण कटाक्षाने टाळण्याची गरज असते.
दररोजच्या वापरातल्या गुळाची ‘शुद्धता’ कशी तपासावी? पाहा, तुमची मदत करतील ‘या’ सात टिप्स…
माश्या बसलेले पदार्थ का खाऊ नये?
प्राण्यांच्या किंवा मानवी शरीरातून बाहेर टाकलेल्या गोष्टी म्हणजे मलमूत्र आणि विष्ठा हेच माश्यांचे खाद्य असतात. अशा घाणीवर बसल्यानंतर, त्यामधील रोग पसरवणारे घटक त्यांच्या पंखांवर, पायावर, आणि तोंडाला चिकटून बसलेले असतात, अशी माहिती BMC च्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २०१८ साली प्रसिद्ध झालेल्या पेपरद्वारे समजते. जेव्हा या माश्या आपल्या खाद्यपदार्थांवर, पाण्यावर बसतात, तेव्हा आपोआपच रोगराई पसरवणारे जिवाणू त्यामध्ये पसरतात.
माश्या पदार्थ कश्या खातात?
माश्या खाद्यपदार्थांवर बसल्या की लगेच ते खाण्यास सुरुवात करतात, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तसे अजिबात नाही. खरंतर माश्यांच्या तोंडात दात नसतात, त्यामुळे ते अन्न चावू शकत नाहीत किंवा त्याचा तुकडा तोडू शकत नाहीत. मात्र, असे असले तरीही पदार्थ खाण्यासाठी माश्या एंझाइमयुक्त लाळ, थुंकी अन्नावर सोडतात किंवा त्याची उलटी करतात. परिणामी त्या लाळेतील घटक आपण खात असणाऱ्या गोष्टींमध्ये पसरतात, अशी माहिती सिडनी विद्यापीठाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली असल्याचे एडीटीव्हीच्या लेखावरून समजते.
नंतर माश्या त्यांनी सोडलेल्या लाळेत, पदार्थाचा एकत्र झालेला रस शोषून स्वतःचे पोट भारतात. पण, ही क्रिया यापेक्षासुद्धा अधिक किळसवाणी आहे. कारण जेव्हा लाळ किंवा एंझाइमची उलटी माश्या पदार्थावर करत असतात, तेव्हा त्या बसल्याबसल्या पदार्थावरच मलविसर्जन करतात. मादी माशी असल्यास ती त्या ठिकाणी अंडीदेखील घालू शकते, त्यामुळे माश्या लागलेले पदार्थ खाण्याआधी १० वेळा नक्कीच विचार करावा.
हेही वाचा : स्वयंपाकघरात एकही झुरळ दिसणार नाही; घरातील उदबत्त्या अन् कापूर करतील तुमची मदत! पाहा ही सोपी हॅक….
पदार्थांवर माश्यांना बसण्यापासून कसे रोखावे?
आपल्या अवतीभोवती घोंगावणाऱ्या माश्यांना आपण पटकन उडवून लावतो. मात्र, फार काळ माश्यांना या पदार्थांवर बसण्यापासून थांबवणे खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही काय करू शकता ते पाहा.
१. बाहेरचे पदार्थ टाळा
ज्या ठिकाणी अस्वच्छता आहे, रस्त्याच्या आजूबाजूला घाण दिसत असल्यास त्या ठिकाणाहून कोणतेही पदार्थ खाण्यासाठी घेऊ नका.
२. पेस्ट कंट्रोल करणे
घरामध्ये वेळोवेळी रासायनिक फवारणी करून कोणत्याही प्रकारच्या माश्या, मुंग्या, झुरळ इत्यादी कीटक दूर ठेवावे. त्यासोबत अनेक घरगुती उपाय असतात, त्यांचा वापर करावा.
३. घरातील अस्वच्छता
घर आणि स्वयंपाकघर पसरलेले असल्यास, स्वच्छ नसले तर किडे आणि माश्या येऊ शकतात. ओट्यावर उघडे ठेवलेले पदार्थ, शिळे अन्न अशा सर्व गोष्टी त्यांना आमंत्रण देत असतात.
हेही वाचा : ओडिसाच्या ‘सिमिलीपाल काइ’ लाल मुंग्यांच्या चटणीला मिळाला GI टॅग; जगभरात अजून कुठे खाल्या जातात मुंग्या?
४. घराबाहेर खाताना
तुम्ही जर पिकनिक, पार्टी इत्यादी गोष्टी घराबाहेरच्या मोकळ्या जागेवर करायचा विचार करत असल्यास पिवळ्या दिव्यांचा वापर करा आणि पदार्थ झाकून ठेवा.