गोड पदार्थ आणि मधुमेह यांचा छत्तीसचा आकडा असला तरी मर्यादित साखर असलेल्या चॉकलेटचा मात्र ‘टाइप २’ मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो, असे एका संशोधनात दिसून आले आहे. चॉकलेटमध्ये असलेले एक संयुग मधुमेहापासून या व्यक्तींचे संरक्षण करू शकते. अर्थात रेड वाइनमध्येही ते संयुग असते.
 जास्त प्रमाणात फ्लॅवनॉइडस सेवन केल्याने टाइप २ मधुमेह असलेल्या व्यक्तींना फायदा होतो, असे ईस्ट अँजेलिना विद्यापीठ (यूइए) व लंडनचे किंग्ज कॉलेज या दोन संस्थांच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. त्यांच्या मते बेरीज, चहा व चॉकलेट या इतर पदार्थातही फ्लॅवनॉइड असतात, त्यात अँथोसायनिन या घटकद्रव्याचाही समावेश असतो. फ्लॅवनॉइडसचा आहारात मोठय़ा प्रमाणात समावेश केल्याने रक्तातील शर्करेचे नियंत्रण योग्य प्रकारे केले जाते. किमान २००० व्यक्तींवर केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की, मधुमेह, लठ्ठपणा , ह्रदयरोग व कर्करोग यांच्याशी संबंधित असलेली लक्षणेही या पदार्थामुळे कमी होतात.
यूइएच्या नॉरवित मेडिकल स्कूलचे प्रा. एडिन कॅसिडी यांच्या मते  पार्सले,थाइम व सेलेरी या  वनौषधी स्वरूपातील भाज्यांत आढळणारे फ्लॅवोन्स व बेरीज, तांबडी द्राक्षे, लाल-निळी फळे व भाज्यातील  अँटोसायनिन हे घटक असतात.फ्लॅवनॉइडच्या या उपगटांच्या आधारे त्यांनी प्रयोग केले. त्यात मधुमेह तसेच वर उल्लेख केलेल्या रोगांना रोखण्याची क्षमता असते हे दिसून आले आहे. मानवी पातळीवर फ्लॅवनॉइडसच्या उपघटकांचा नेमका काय परिणाम होतो याचा प्रथमच इतका सविस्तर अभ्यास करण्यात आला आहे.
फ्लॅवनॉइडसमुळे इन्शुलिनला होणारा विरोध कमी होतो व ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित होऊन मानवी शरीरातील दाह कमी होतो, असे या संशोधनात आढळून आले. ज्यांनी जास्त प्रमाणात अँथोसायनिन व फ्लॅवोन सेवन केले होते त्यांच्यात इन्शुलिनला विरोध कमी झाला, टाइप दोनच्या मधुमेहात इन्शुलिनला होणारा विरोध हे प्रमुख लक्षण असते. लाल द्राक्षे, त्यांच्यापासून बनवलेली वाईन, बेरीज सेवन करणाऱ्या व्यक्तींना यात फायदा होतो असे कॅसिडी यांनी म्हटले आहे. ज्यांच्या आहारात अँथोसायनिनचा समावेश जास्त आहे त्यांच्यात मधुमेह, लठ्ठपणा, ह्दयरोग, कर्करोग यांची लक्षणे कमी होण्यास मदत होते, असे ‘न्यूट्रिशन’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनात म्हटले आहे.