Winter Digestion tips: थंडीमुळे नकळत आपले पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते यामुळे मलातील द्रवगुण कमी होतो व कठीण मलप्रवृत्ती होण्यास सुरुवात होते. एखादवेळी बद्धकोष्ठतेचा त्रास होणं ठिक असलं तरी हा त्रास सतत आणि जास्त प्रमाणात होत असेल तर मात्र वेळीच योग्य ते उपाय करायला हवेत. हिवाळा येताच पचनाच्या समस्या वाढू लागतात. तिखट अन्न आणि हवामानातील बदलांमुळे अनेकांना पोटाची गडबड होऊ लागते, परंतु आता तुम्हाला यावर चिंता करण्याची आवश्यकता नाही. जर तुम्हालाही हिवाळ्यात पचनाच्या समस्या भासत असतील, तर आज या लेखात आम्ही तुम्हाला काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला लगेच आराम मिळू शकेल.
थंडीच्या काळात रात्री झोपताना कोमट दूध-तूप, कोमट पाणी यांचे आवर्जून सेवन करावे. त्यामुळे जड कोठा हलका होण्यास आणि मल बाहेर पडण्यास मदत होते.आहारात द्रव पदार्थांचे प्रमाण वाढवल्यास मल मोकळा होण्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे दर काही वेळाने आठवणीने पाणी पिणे, गरम सूप, वरण, सार अशा गोष्टींचा समावेश आहारात वाढवायला हवा.
भाजलेली बडीशेप, इसबगोल आणि हरीतकी (हरडे पावडर) हे तिन्ही सम प्रमाणात एकत्र करायचे. दुपारच्या जेवणाआधी गरम पाण्यासोबत अर्धा चमचा आणि रात्री झोपण्याच्या अर्धा तास आधी अर्धा चमचा असे न चुकता घ्यायचे. त्रास जास्त असेल तर १ चमचा घेतले तरी चालते. मात्र याने पोट साफ होण्यास चांगलीच मदत होत असल्याने हा उपाय जरुर ट्राय करावा.
मेथीचे दाणे आणि गरम पाणी
मेथीला भाजून घ्या त्यानंतर त्यामध्ये काळे मिठ मिक्स करा. आता मेथीचे दाणे गरम पाण्यामध्ये टाका आणि हे पाणी प्या. मेथीच्या दाण्यांमुळे शरीरामध्ये उष्णता वाढते. त्यामुळे पोटदुखी कमी होते.
हेही वाचा >> Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
गरम पाण्याच्या पिशवीने पोट शेकावे
हिवाळ्यामध्ये थंडीने पोटदुखी होते. त्यामुळे गरम पाण्याच्या पिशवीने किंवा गरम पाणी असलेल्या बॉटलने पोट शेकावे.
बेकिंग सोडा आणि गरम पाणी
हिवाळ्यात अपचनामुळे अनेक वेळा पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे बेकिंग सोडा आणि गरम पाणी प्यायल्याने पचन क्रिया चांगली होते. तसेच पोटदुखी देखील कमी होते. एक चमचा बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यामध्ये मिक्स करून प्या.
हिवाळ्यात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी फॉलो करा या टिप्स
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओमेगा-३ फॅटी अॅसिड असलेल्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तुम्ही रोज अक्रोड, बदाम इत्यादी ड्रायफ्रुट्सचे सेवन केले पाहिजे. यासोबतच फळे आणि भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे. जीवनसत्त्वे अ, क, ब आणि फायबर असलेली फळे आणि भाज्या रोगप्रतिकारशक्ती वाढवून शरीरातील मेटाबोलिजम सुरळीत ठेवण्यास मदत करतात.