सकाळी १० वाजताची विरार- चर्चगेट लोकल. नेहमीप्रमाणे लोकल खच्चून भरलेली. बोरिवली स्थानकावर येतानाच बोरिवलीकरांचे आत घुसण्यासाठीचे सर्वोतोपरि प्रयत्न. ‘बोरिवलीसाठी एवढ्या ट्रेन असतानाही यांना विरारच्या ट्रेनमध्ये का चढायचं असतं…’, ‘यांना तर चढायची शिस्त ही नाही’ असे निरर्थक टोमणे लगावण्यात वसई- विरारकरांचा हात कोणीच पकडू शकत नाही. तर दुसरीकडे बोरिवलीकरही काही कमी नाहीत. ट्रेन तुमच्या नावावर आहे का? आमच्या बोरिवली ट्रेनमध्ये आगाऊपणे चढता त्याचं काय? आम्ही तुम्हाला गावी राहायला सांगितलं का? असे टोमणे त्यांच्याकडूनही येतातच. विरार लोकलने प्रवास करणाऱ्या कोणत्याही विरार- बोरिवलीकरांचा प्रवास या भांडणांशिवाय अपूर्णच आहे. ट्रेन या दोघांचीही नसून सरकारची आहे हे त्यांना कधी कळणार देव जाणो.. शाब्दिक भांडणांमध्ये काही वेळा खालच्या पातळीवर येऊन महिला भांडण करतात. त्यांचं हे भांडणं ऐकून खरचं यातील एकीलाही आपण कोणत्या भाषेत भांडत आहोत याची जाणिव नाहीये का? जनाची नाही पण किमान मनाची लाज तरी बाळगावी असा विचार इतर महिलांच्या मनात नक्कीच येतो. पण दुसऱ्या दिवशी त्यांच्यामधीलच एक त्या वादाचा एक भाग झालेली असते.
विरार- चर्चगेट लोकलमधील असाच एक दिवस होता. विरारच्या गाडीत काही अलिखित स्वयंघोषीत नियम असतात बोरिवलीआधी चढलेल्या बायकांना आधी बसायला द्यायचे त्यानंतर जर जागा मिळाली तर बोरिवलीच्या महिलांनी बसायचे. असे केले नाही तर तुम्ही अक्षम्य गुन्हा केला आहे ज्याची शिक्षा तिथे उपस्थित महिलाच करतात. एकदा अशीच एक ५० शी पार महिला जागा मिळाली आणि बसली आणि तिच्यावर डब्यातील चार ते पाच बायकांनी हल्ला केला. शाब्दिक वादापर्यंत सारं काही ठिक होतं. पण नंतर त्या चार पाच महिलांनी त्या ५० पार महिलेला मारायला सुरूवात केली. ती त्या जागी बसलीच कशी हा राग त्यांच्यात एवढा होता की शेवटी त्या महिलेचा चष्मा मोडला आणि ओढणीने तिचा गळा दाबत होते. शेवटी काही सुशिक्षित महिला मध्ये पडल्या आणि त्यांनी हा वाद थांबवण्याचा वरवरचा प्रयत्न केला. पण एखादीच्या जीवापेक्षा ती सीट महत्त्वाची असल्यामुळे त्यांच्यापैकी एकही महिला त्यांना मारण्याचे सोडत नव्हती. अखेर अंधेरी स्टेशन आले आणि त्या अर्धमेल्या झालेल्या बाईला खाली उतरवण्यात आले.
त्या महिलांमध्ये २० ते २२ वर्ष असलेली एक मुलगीही होती. त्या महिलेला पोलिसांनी खाली उतरवल्यानंतर अचानक त्या मुलीला उपरती झाली की ‘आपण तिला मारतानाचा व्हिडिओ काढायला हवा होता. मस्त व्हायरल झाला असता…’आपण कोणत्या गोष्टीबाबत काय बोलतो याची जाणीवही त्या २० वर्षांच्या मुलीला नव्हती. आपली मनं दुसऱ्यांसाठी एवढी बोथट झाली आहेत का हाच प्रश्न यातून उपस्थित केला जातो. बाईच बाईसाठी उभी राहत नसेल तर पुरुषांकडून ती अपेक्षा का करावी? लोकल ट्रेनमधला हा तर एक प्रसंग झाला असे असंख्य प्रसंग दररोज ट्रेनमध्ये घडत असतात आणि अनेकजण बघ्याची भूमिका बजावत असतात. ट्रेनचा काही तासांचा प्रवास जर महिला एकमेकांना सहन करु शकत नाहीत तर घर, ऑफिसमधले एकमेकींसोबतचे नाते कसे दृढ होणार?
स्त्रीयांचे एकमेकांतील नातेसंबंध पाहिल्यास असे दिसून येते की, सासू- सून, नणंद- भावजय, जावा- जावा यांच्यात फारसे पटत नाही. ही नाती इतर नात्यांपेक्षा भांडणांमुळे आणि मतभेदांमुळे बदनाम झाली आहेत. चुकून एखाद्या सासू- सुनेचे चांगले नाते असले तरी ते कुटुंबातील इतर महिला सदस्यांना पटत नाही आणि मग त्यांच्या कुटुंबात कुरघोडी करायला सुरूवात करतात. एखादी भावजय आणि नणंद चांगल्या मैत्रिणी का होऊ शकत नाहीत? पण नात्यात एकीची दुसरीकडून काही ना काही अपेक्षा असते जी पूर्ण झाली नाही की वादाची ठिंणगी पडते. त्यात महिलांना स्वतःहून दुसरी महिला वरचढ झालेली पाहवत नाही. त्यांच्यात एखादी स्वावलंबी मुलगी डोकं वर काढू लागली की इतर महिला समाजाला ते पटत नाही. मग समस्त महिला समाज एकवटून त्या स्वावलंबी महिलेला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असतात.
असे का याचा विचार केल्यास तो मुलीच्या जन्मापासून होतो. वंशाला दिवा हवा ही जशी पुरुषाची इच्छा असते त्याहून जास्त इच्छा ही महिलेची असते. म्हातारपणी मुलगी नाही तर मुलगाच सांभाळणार असे तिला वाटत असते. अगदी मुलाच्या लग्नावेळीही आपल्या घरी येणारी मुलगी ही सून नसून कामांना हातभार लावणारी व्यक्ती आहे असेच तिच्याकडे पाहिले जाते. सुनेकडे मुलगाच हवा याचा अट्टहास करणारी सासू, मुलींच्या भ्रुण हत्या करा असा सल्ला देणाऱ्या महिला डॉक्टर, मुलगी आहे हे कळल्यावर अबॉर्शन करणारी निर्दयी आई या सगळ्यांकडे पाहिले की याचे उत्तर मिळतं.
अनेकदा स्त्रीयाच स्वतःला आणि पर्यायाने इतर महिला समाजाला कमी लेखत असतात. त्यामुळे सहसा त्या एकमेकींना मदतही करायला जात नाही. एखादीच्या नुकसानात त्या स्वतःचा फायदा पाहतात. दोन मुली चांगल्या मैत्रिणी होऊ शकत नाहीत असे म्हटले जाते. याचे मुख्य कारण त्यांच्यातील मत्सर हा असतो. मुळात स्त्रीयांमध्ये हा गुण कमी अधिक प्रमाणात असतोच. त्यामुळे एखाद्या मैत्रिणीचे फार चांगले झालेले दुसरीला आवडेलच असे नाही. उदाहरण द्यायचे झाले तर एखाद्या मैत्रिणीचा प्रियकर असेल तर तिची मैत्रीण तो प्रियकर किती वाईट आहे आणि तिची निवड चुकतेय हे सांगण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न करेल. असे प्रत्येकवेळी होतेच असे नाही, पण म्हणून असे होतच नाही असे म्हणणेही चुकीचे ठरेल.
आपण आपल्यातल्याच असुरक्षिततेमुळे दुसऱ्या स्त्रीला कमी लेखतो किंवा ती आपल्याहून वर-चढ होणार नाही या प्रयत्नात असतो. पण आता एकमेकींविरोधात नाही तर एकमेकींसाठी उभं राहायची वेळ आहे. एखादी सीट गेलीच तर काय फरक पडतो… त्याचप्रमाणे नात्यातल्या तिची चूक समजून घेतली तर काय फरक पडतो.. तिच्या चुकीकडे कानाडोळा केल्याने नातं अजून घट्ट होणार असेल तर फायदाच आहे ना.. सासू- सूना जर आई- मुलगी झाल्या आणि नणंद- भावजय जर सख्या मैत्रिणी झाल्या तर तुमच्याच नात्याचे उदाहरण इतर समाज देईल यात काही शंका नाही. भांडण होणार नाही असे बोलणे अतीशयोक्ती ठरेल पण कोणत्या पातळीला जाऊन भांडतोय याचा तर आपण नक्कीच विचार करु शकतो ना? आपल्यातला इगो महत्त्वाचा आहे का ती जास्त महत्त्वाची आहे याचा विचार प्रत्येकीनेच करावा…
मधुरा नेरुरकर
madhura.nerurkar@loksatta.com